Breaking News

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान

गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली.
पोलिस विभागातील विविध कार्यक्रमातील सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृहविभागाकडून सी-६० जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्यदलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-६० जवानांचे पथक उपस्थित होते.
सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतुकाची थाप मारली.
मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही अहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-६० जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार काढले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नक्षलवाद्याविरुद्ध लढत असताना आता सी-६० जवानांची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही या सी-६० पथकाचा दरारा निर्माण झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले.
रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात रेल्वे मार्गावर भाष्य केले. यासाठी जिल्हा‍धिकारी, पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पुढील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने मुंबईला बैठक आयोजित करु असे सांगितले. यावेळी अडचणी, निधी, तसेच कामे वेळेत कशी पुर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *