Breaking News

संजय राऊतांची स्पष्टोक्ती, अन्यथा देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता

मागील तीन-चार दिवसांपासून भारत जोडो यात्रे दरम्यान आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा सावरकर यांच्या माफीनाफ्यावरून टीका केल्याने राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना थेट पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. या टीकेला उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून सावरकरांना विज्ञाननिष्ठ म्हणता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे ही विज्ञाननिष्ठच होते. त्यांच्यामुळे भारत विकासाच्या मार्गावर चालला अन्यथा देशाचा पाकिस्तान व्हायला कधीच वेळ लागला नसता असे खोचक प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत हे सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रणजीत सावरकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

तसेच यावेळी संजय राऊत म्हणाले, कोणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. हा देश विकासाच्या वाटेवर नेण्यात आणि विज्ञानाच्या दिशेने नेण्यात नेहरूंचं खूप मोठं योगदान आहे. जर सावकर विज्ञाननिष्ठ होते, असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या वाटेने देशाला पुढे नेण्याचं काम नेहरूंनी केले. अन्यथा या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची आज अवस्था आहे, तशी आपली अवस्था होऊन दिली नाही म्हणून हा देश नेहरूंचा ऋणी राहील, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सुरू असलेल्या वादंगात आता भरपूर वाद-प्रतिवाद झाला आहे. आमच्यासाठी सावरकरांसह महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे नेते प्रिय आहेत. स्वातंत्र्यसैनिक हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याबाबतचं स्पष्टीकरण देण्यासाठी ते आता हयात नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणावरही चिखलफेक करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आज सामना या आपल्या मुखपत्रातूनही राहुल गांधी यांना फटकारले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *