Breaking News

३० जूननंतरही असेच राहणार, पण रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी
सद्यपरिस्थितीतील लॉकडाऊन अर्थात अनलॉक हे ३० जूननंतरही असाच राहणार आहे. तसेच सध्या आपण अंतिम टप्प्यातील कोरोना विरोधी लढ्यात असल्याने सगळ्याच गोष्टी आपणाला अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून आगामी काळात कोरोनाबाधीतांची संख्या अशीच वाढत राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत उपचारासाठी प्लाझ्माची केंद्र आपण लवकरच सुरु करणार असल्याने रक्तदात्यांप्रमाणे प्लाझ्माचे दान करा असे आवाहन त्यांनी केले.
आज समाजमाध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांनी वरील आवाहन केले.
मागील काही दिवसांमध्ये प्लाझ्मा थेरपीचे प्रयोग आपण केलेले आहेत. यामध्ये १० पैकी ९ लोक बरे झाले असून ७ लोक बरे होवून घरी गेलेले आहेत. त्यामुळे अशा बरे होवून गेलेल्या लोकांनी रक्तदान करण्यासाठी जसे इतर लोक पुढे येतात. त्याप्रमाणे त्यांनीही त्यांच्या रक्तातील प्लाझ्माचे दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करत त्यांच्या रक्तातील अॅण्टी बॉडीज् मुळे इतर कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करत प्लाझ्माची केंद्रे आपण राज्यात सुरू करणार असून अशी केंद्रे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ज्येष्ठ डॉक्टरांची या लढ्यात गरज असून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत. त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देवू मात्र तुम्ही आपली सेवा सुरु करावी तसेच उपचारासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी डॉक्टरांना केले.
बोगस बियाणे विकणाऱ्यांकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार
मागील काही दिवसांपासून बोगस बियाणांच्या विक्रीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या बियाणांमुळे शेतकऱ्यांवर विनाकारण खर्चाचा आणि कर्जाचा भार वाढला आहे. त्यामुळे अशी बोगस बियाणे विकणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना झालेल्या खर्चाची किंवा त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम वसून करून ती शेतकऱ्यांना परत देण्यात येणार असून अशांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनचा निर्णय तुमच्या हाती
अनेक थांबलेल्या गोष्टी आपण सुरु केल्या मात्र अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. भाजी मार्केट, व्यायामासाठी आपण पुरेशी मोकळीक दिली. मात्र भाजी विक्रेते पुरेशी खबरदारी घेत नाहीत. ते तोंडाला मास्क लावत नाहीत. कुठेही कसाही हात लावत आहेत. लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यामुळे कोरोना तुमच्या घरात येत आहे. आपल्याला आणखी काही दिवस काळजी घ्यावी लागणार असून घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे किंवा साबणाने स्वच्छ हात धुणे आधी गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तरीही अनेक जण या गोष्टीचे पालन करत नाहीत. त्यामुळे राज्यात ही संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक जण मला लॉकडाऊन लागू करण्याबाबत विचारणा करत आहेत. आता तुम्हीच ठरवा की लॉकडाऊन लागू करायचा कि नाही ते. आपण हे सुरु केलेय ते बंद करण्यासाठी नव्हे. त्यामुळे पुरेशी काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले.
हे औषधं तर आपण पूर्वीपासून वापरतोय
काही दिवसात रेमडेसीवीर, फ्लावीरा, डेस्कामेथाझोन यासह अन्य काही औषध सर्वच शासकिय आणि खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. मात्र यातील डेक्सामेथाझोन, फ्लावीरा सारखी औषध आपण पूर्वीपासूनच वापरत आहोत. काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळाने कोरोनावरील औषध सापडल्याचा दावा करत त्याबाबत लिहिले होते. त्याबाबत आपल्या टास्कफोर्समधील डॉक्टरांना विचारले असता त्यांनी ती औषध वापरत असल्याचे मला सांगितले. त्यामुळे या आजारावरील उपचार करताना आपण जगाच्या बरोबरीने चाललो असल्याची बाब त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिली.
आषाढी एकादशीला जाणार पण तुमचा प्रतिनिधी म्हणून
पंढरीच्या पांडूरंगाच्या दर्शनाला मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच वारकऱ्यांचा जनसागर तेथे राहणार नाही. मात्र मी पांडूरंगाला साकडे घालणार असून तुझा चमत्कार दाखवून या कोरोनाला घालवून टाक आणि पूर्वीसारखं सगळ्यांचे आयुष्य सुखा-समाधानाचे कर म्हणून. वारकऱ्यांनीही राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरूनच आषाढी वारी साजरी करायचा निर्णय घेतला त्याबाबत वारकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
याशिवाय दहीहंडी, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनीही याच पध्दतीने निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *