Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला मंदिरांचे आश्वासन तर विरोधकांना इशारा घट झालीतरी कोविड सेंटर सुरुच ठेवणार: पण विकासकामात खडा टाकू नका

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची संख्या कमी होत असली तरी ही संख्या कमी करण्यामागे तुम्ही सर्वजण आहात. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस आपल्या सर्वांच्या कसोटीचे असून युरोपातील परिस्थिती पाहता राज्यात त्याची पुन:रावृत्ती नको म्हणून आणखी सहा महिने कोविड सेंटर आपण असेच सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत आरेतील कारशेड कांजूर मार्गला हलविण्यानंतर जो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र मुंबई आणि राज्याच्या विकासात मिठाचा खडा टाकू नका असा इशारा भाजपाचे नाव न घेता देत त्याची उत्तरे आमच्याकडे असून वेळ आली की देवू असा सज्जड दमही त्यांनी दिला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.

निष्काळजीपणामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नेदरलॅण्ड मध्ये तर आता घरात मास्क घालणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी मास्क वापरावा राज्यात मला पुन्हा पुन:रावृत्ती नको असे सांगत एखाद्या बाधिताने जर मास्क घातला नाही तर तो किमान ४०० जणांना संसर्ग देत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्रिसुत्राचे पालन केले पाहिजेच. जर एखाद्याने मास्क नाही वापरला तर त्याला दंड आकारणारच असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळेच राज्यातील जीवन पुर्वपदावर आणण्यासाठी आपण हळुहळू पावले टाकत असल्याचे सांगत शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकांची आपण कोविड-१९ ची चाचणी करणार आहोत. त्याबरोबर शाळेचे सॅनिटायझेशनही केले जाणार आहे. राज्यात, देशात आणि जगातच कोरोनाचे संकट असताना काही जण मंदिरे कधी उघडणार अशी यावरून टीका करत होते. मात्र आपण मंदिरे-प्रार्थनास्थळेही पुन्हा उघडणार आहोत. पण ते दिवाळीनंतर त्यासाठी दिवाळी झाल्यानंतर यासंदर्भातील एसओपी-नियमावली तयार करणार असून त्यानंतर या गोष्टी आपण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाबाजूला मुंबईतील कोरोनाची संख्या कमी होत असताना दुसऱ्याबाजूला मात्र दिल्लीतील बाधितांची संख्या वाढता वाढतच चालली आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता तेथील प्रदुषणात वाढ झाल्याने तेथील बाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नका असे आवाहन करत या फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होवून संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात मी कायद्याने बंदी आणू शकतो मात्र राज्यातील जनतेवर माझा विश्वास असून या विश्वासावरच ही बंदी आणणार नसल्याचे सांगत मी काही तुमच्यावर आणीबाणीसारखी परिस्थिती आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरेतील कारशेड कांजूर मार्गला नेण्यावरून माझ्यावर टीका करण्यात येत आहे. ती जमिन मिठागरांची असल्याचे सांगण्यात येत आहे. एकप्रकारे मुंबईकरांच्या मेट्रो विकासाच्या स्वप्नात मीठ कालविण्याचे काम सुरु असल्याचे सांगत मुंबईसह राज्याच्या विकास कामात मीठाचा खडा टाकू नका असा इशारा त्यांनी भाजपाचे नाव न घेता विरोधकांना देत त्याची उत्तरे आमच्याकडे असून वेळ आल्यानंतर ती देणार असल्याचे ते म्हणाले.

दिवाळीच्या निमित्ताने दरवाजा उघडला असल्याचे सांगत या उघडलेल्या दरवाज्यातून सुख, शांती, समाधान आणि समृध्दीच आत येवू द्या कोरोनाला आतमध्ये येवू नका असे आवाहन करत जीवन पुर्व पदावर आणताना आपण मुंबईतील लोकल सेवेप्रकरणी केंद्राशी संपर्क ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील कोरोना आपल्याला शुन्यावर आणायचा असल्याने सगळ्यांनीच सतर्क राहीले पाहिजे. आजपर्यतचे सर्व सण आपण अंत्यत संयमाने आणि साधेपणाने साजरे केले. कोरोनाची संख्या आपल्याला शुन्यावर आणायचीय. काही जण टीका करत होते की, कोरोनाची संख्या आवाक्याबाहेर जातेय. सरकारकडे पैसा नसल्याने परिस्थिती कठीण असल्याचे मेसेज सर्वांना पाठवित माझ्यावर टीका करण्याचे काम विरोधकांकडून सुरु आहे. मात्र महाराष्ट्राच्या भल्यासाठी माझ्यावर कितीही टीका झाली तर मी त्या टीकेला तोंड देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जनतेसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना राबविण्यात आली. त्या सर्वेक्षण काळात ५५ हजार जणांना कोविड झाल्याच आढळून आलं. ४ लाखापर्यत रूग्णशय्या नेल्या. ३.५० लाखांना श्वसनसंस्थेचा आजार असल्याचे आढळून आले. १३ लाख हाय ब्लेड प्रेशर, ८.६९ लाखाहून अधिक डायबेटीक्स आहेत. हार्ट अॅटक ७० हजार जणांना, १७ हजार जणांना कर्करोग यातील बहुतेक जण बरे होवून घरी गेले. ६० हजार जणांनी ही मोहिम राबविली, त्यांचे आभार महाराष्ट्र ऋणी राहील. यंत्रणेला सांगितल्याचे स्पष्ट करत आता पहिला सर्वे पूर्ण झाला असून त्या काळातील रूग्णांना संपर्कात ठेवा. थोडी विश्रांती घ्या त्यानंतर पुढचा टप्पा तुम्ही करावे असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र व्देष्ट्यांनी देशात, सगळीकडे संकटाचा काळ असताना कायदा व सुव्यवस्था कोलमडली, आर्थिक अडचणीत आहे सारखी बदनामी केली. ती बदनामी मोडून आपण गुंतवणूकीचे सामंज्यस करार केले. घरात बसून मी काम करतोय. अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याचे सांगत इन्फेक्शनसाठी हॉस्पीटल सुरु करतोय. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत केंद्राशी बोलणी करत असून रेल्वेमंत्री गोयल आपल्याला मदत करत आहेत. ४१ लाख हेक्टर जमिन अतिवृष्टीने बाधित झाली असून शेतकऱ्यांना मदत म्हणून १० हजार कोटी रूपये दिले आहेत. केंद्राकडून ३८ हजार कोटी रूपयांपैकी फक्त ५-७ हजार कोटी रूपये जीएसटीचे आले आहेत. बाकिचे अद्याप आले नसल्याचे त्यांनी सांगत सध्याचा काळ हा अडचणीचा काळ असून अनेकांनी तुम्हाला डिवचल तरी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याशिवाय राज्यातील सर्व पिकांसाठी खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे सरकार काही परदेशातून आलेलं नाही. त्यामुळे हे सरकार हे तुमचं सरकार आहे. अडचणीचे दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्रिसुत्रीचे पालन करावे असे जाहीर आवाहनही केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *