Breaking News

बारसूत उध्दव ठाकरे यांचा सवाल, मी पत्र दिल्याचे नाचविता….मग त्यावेळी शेपुट घालुन का बसले ? मिंद्याच्या सांगण्यावरूनच बारसूची जागा सुचविली होती

कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षाकडून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जागा सूचविणारे पत्र दाखवित सॉईल टेस्टींगला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आधीच जाहिर केल्याप्रमाणे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सोलगांव बारसू या गावांचा दौऱा केला. सोलगांव येथे पोहचल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी येथील त्यांच्याच काळात जाहिर केलेल्या टुरिस्ट पाँईट कातळशिल्पाची पाहणी केली. त्यानंतर येथील स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी बारसू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हणाले, बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. पण आता प्रकल्प राबविताना दडपशाहीचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे दडपशाही केली जातेय याचा अर्थ प्रकल्पात काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली.

वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, एअरबस प्रकल्पावरून उध्दव ठाकरे यांनी भाजपा-शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले, आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले? आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा. गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचं? असा सवालही केला.

उध्दव ठाकरे म्हणाले, मला या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकार एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. हे सरकार पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. जर माझी सगळ्या गोष्टींची नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला असता का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. इतकंच नाही तर जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसले होते? असाही खोचक सवालही शिंदे गटाला केला.

प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य हा परिसर आहे. त्या परिसराचा, निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे. चांगल्या गोष्टी आपण जरुर केल्या. चिपी एअरपोर्टही माझ्या कालखंडात आला. इथल्या मोठ्या आणि सूक्ष्म माणसांना तो आणता आला नाही. जर एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? ते मला मुळीच मान्य नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

कोकणातील रिफायनरी प्रकल्प गुजरातला द्या आणि वेदांन्ता फॉक्सकॉन, गिफ्ट सिटी महाराष्ट्रात आणा. मोठ्या आस्थापनांची कार्यालये दिल्ली नेण्यात आली. ती मुंबईला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला नेल्या. विनाशकारी आणि विवादास्पद प्रकल्प कसे लादू शकता, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

स्थानिक आमदार राजन साळवी बारसूतील प्रकल्पाचं ८ दिवसांपूर्वी समर्थन करत होते. आता त्यांची भूमिका बदलली आहे? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या सर्वांची भूमिका एकच आहे आणि होती. जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध नसता, तर आम्ही मध्ये येण्याचं कारण नव्हतं. पण, ज्या पद्धतीने दडपशाही सुरू आहे, म्हणजे काहीतरी काळभेर आहे. ही दडपशाही पाहिल्यानंतर राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही आम्हाला फसवत आहात. पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यात यावी का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी म्हणाले की, जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जायला पाहिजे. मी पत्र दिलं होतं, तर लोकांसमोर जाऊन उभं का राहिलो? एवढं धाडस सरकारने करावं. पण, उपऱ्यांची सुपारी घेऊन तुम्ही माझ्या भूमिपुत्रांच्या घरावर वरवंटा का फिरवत आहात?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *