Breaking News

सलिम कुत्ता प्रकरणी अंबादास दानवे, एकनाथ खडसेंचा गिरिष महाजनांवरून सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील सहआरोपी सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नाशिकमधील नेत्याकडून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केला. त्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटत विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सलिम कुत्ता याच्यासोबत भाजपाचे आमदार गिरिष महाजन यांचे नाव घेत ते ही उपस्थित होते असा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यास उपसभापतीनींच हरकत घेतल्याने विधान परिषदेत गोंधळ निर्माण झाला.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर २८९ अन्वये शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सलिम कुत्ता प्रकरणी बोलण्यास सुरुवात केली. तसेच बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत मंत्री गिरिष महाजन उपस्थित राहिले. त्यासंदर्भातील फोटोही सभागृहात दाखविला.

त्यावर उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी हरकत घेतली. २८९ च्या प्रस्तावात आपण कोणत्याही मंत्र्याचे नाव लिहिले नाही. त्यामुळे आपणही कोणाचे नाव घेऊ नये अशी सूचना केली.

त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, तुम्हाला सुधाकर बंडगुजर यांचे नाव घेतलेले चालते आणि एका मंत्र्यांचे नाव घेतलेले चालत नाही असा सवाल उपस्थित करत या मंत्र्यांचे देशद्रोह्याशी संबध असून त्याची सखोल चौकशी करावी आणि त्या मंत्र्याने चौकशी पूर्ण होई पर्यंत राजीनामा द्यावी अशी मागणी केली.

तसेच एकनाथ खडसे म्हणाले, नाशिकमधील त्या लग्नाला पोलिस अधिकारी उपस्थित राहतात. त्या मंत्र्यासोबत त्यांचे नगरसेवक गेले. परंतु कारवाई झाली ती पोलिस अधिकाऱ्यांवर झाली. आता नव्याने आलेल्या काही माहितीच्या आधारे त्यांचीही ही चौकशी पोलिसांनी सुरु केली. परंतु आता मंत्र्यांची उपस्थिती सलिम कुत्ता यांच्यासोबत बसल्याचे दिसत असतानाही सरकार कोणतीच कारवाई करायला तयार नाही.

पुन्हा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यास हरकत घेत राज्य सरकार त्यांची भूमिका ठरवेल, त्याचा तपास सुरु झालेला असताना तपास पूर्ण होण्याआधीच तुम्ही ही माहिती कशी उघड करता असा सवाल केला.

त्यावर अनिल परब आक्रमक होत म्हणाले, सलिम कुत्ता हा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असतानाही सरकारमधील जबाबदार मंत्री उपस्थित असल्याचे दिसत असतानाही त्यांची चौकशी करण्याची भूमिका घेत नाही. बाकीच्यांवर मात्र कारवाई होते. मंत्री त्यांच्या पक्षाचे नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून दाऊदशी संबधित व्यक्तीसोबत बसण्याचा परवाना मिळाला आहे का असा सवालही उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सलिम कुत्ता प्रकरणी बोलताना म्हणाले की, नाशिकमधील एका लग्नाच्या कार्यक्रमात आयबीचे अधिकारी उपस्थित राहिले. कालांतरांने त्या अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. याशिवाय एका पक्षाच्या नेत्याचा सलिम कुत्ता सोबत नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या नाशिकमधिल पक्षाच्या पदाधिकाऱ्याची चौकशी पोलिसांनी सुरु केली. परंतु त्याच लग्नाला उपस्थित राहिलेले सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार तथा तथा राज्य मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री गिरिष महाजन यांची साधी चौकशीही मात्र होत नाही असा मुद्दा उपस्थित केला.

त्यातच विधानसभेतील दुसऱ्या एका आमदाराने सलिम कुत्ता याची १९९८ साली हत्या झाल्याची माहिती पुढे आणली. त्यामुळे सध्या तुरुंगात असलेला सलिम कुत्ता कोण असा सवाल केला. तसेच नवाब मलिक यांच्यावरही असेच आरोप करत त्यांना तुरुंगात पाठविले. मग या मंत्र्यावर कारवाई का नाही असा सवाल केला.

त्यातच भाजपाचे प्रविण दरेकर यांनी २८९ च्या विषयावर विरोधी पक्षनेते तेच बोलतात, नाथाभाऊ तेच बोलतात आणि शिवसेनेचे इतर लोकही तेच बोलतात, असा आरोप विरोधकांवर केला. यावर पुन्हा उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, हा विषय विधानसभेचा आहे. त्यामुळे तुम्ही त्या मंत्र्याचे नाव घेऊ शकत नाही. तसेच त्यावर सरकारने चौकशीचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे मंत्र्याची नावे मी कामकाजातून काढून टाकत आहे. तसेच २८९ अन्वये खाली विरोधकांनी दिलेला प्रस्ताव मी फेटाळून लावत असे जाहिर केले.

त्याचबरोबर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, तुम्हाला नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे उट्टे काढायचे आहे, तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. तसेच उद्धव ठाकरे साहेब हे सभागृहात उपस्थित राहिले असल्याने त्यांच्यासमोर इंप्रेशन निर्माण करण्यासाठीच हे तुम्ही करत आहात असे म्हणत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *