Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना असामान्य बनविण्याची… शिवसेना कोणाची याचे पुरावे देण्याची गरज नसून मतदारच निवडणूकीच्या रिंगणात दाखवून देतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? उध्दव ठाकरे यांची भविष्यातील पुढील वाटचाल काय याबाबत राज्यातील जनतेमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रसारीत करण्यात आली.

या मुलाखतीत उध्दव ठाकरे म्हणाले की, सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. पुन्हा एकदा सामान्यांमधून असामान्य घडवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी माझ्या तमाम शिवसैनिक, माता, भगिणींना पुन्हा उठा आणि सामान्यांना असामान्य बनवूया असं आवाहन केले.

आम्हाला शिवसेनेसंदर्भात पुरावे देण्याची गरज नसून मतदारच बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगणात पुरुन टाकतील असा खोचक टोला त्यांनी लगावला.

निवडणूक आयोगासमोर नवा खटला उभा राहतोय. तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचा? असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला अजूनही देशाच्या घटनेवर, कायद्यावर विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असं माझं मत नाही. नाहीतर तुम्हाला सत्यमेव जयते हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्य करावी लागतील एकाची. एक तर असत्यमेव जयते आणि दुसरं सत्तामेव जयते. त्यामुळे सत्तामेव जयतेसमोर असत्य घेऊन तुम्ही जाणार असाल तर लोक ते मान्य नाही करणार असेही ते म्हणाले.

हे दुर्देव आहे महाराष्ट्र असं मला वाटतं पण आज अशी वेळ आणली आहे की ठाकरेंना पुरावे द्यावे लागतात की शिवसेना खरी किंवा खोटी असं म्हटलं. त्यावर उत्तर देताना म्हणाले की, लोक वाट बघतायत निवडणुकांची. आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ दे यांनाच पुरुन टाकतो असं लोक म्हणतायत. जनताच त्यांना राजकारणात पुरुन टाकेल.

अशाप्रकारची फूट याआधी राणे-भुजबळांनाही पाडता आली नव्हती, असं का घडलं? असा थेट प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, ज्यांना मी अधिकार दिले होते. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते पण मला कुजबूज ऐकू येत होती की, अरे काय मुख्यमंत्री? नगसविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे. मलाईदार खातं म्हणतात. मी मलाई वगैरे खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे सामान्य प्रशासन, न्याय व विधी खाती ठेवली होती. आयटीमध्ये मला सगळ्या खात्यांमध्ये तंत्रज्ञान वापरता येईल का हा एक माझा विचार होता. काही काळ एका मंत्र्याने दिवे लावले म्हणून त्यांचं खातं मला थोडे दिवस माझ्याकडे ठेवावं लागलं होतं असं उत्तर देत आपण बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यावर अधिक विश्वास टाकल्याचे त्यांनी सूचित केले.

नेमकं काय चुकलं? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी आपलीच चूक असल्याचं सांगत म्हणाले चूक माझी आहे आणि पहिल्याच फेसबुक लाईव्हमध्ये मी हे कबूल केलं होतं. माझा गुन्हा आहे की, मी यांना कुटुंबातील समजून त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला,

त्यांना ताकद दिली ही माझी चूक आहे. त्यात ताकदीने त्यांनी उलटा वार केला. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. पण तेवढी ताकद त्यांच्यात नाही, कारण आई ही आईच असते असा गर्भित इशारा देत निष्ठा विकली जाऊ शकत नाही, जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते असंही त्यांनी बंडखोरांना सुनावले.

मुख्यमंत्री होणं चुकलं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कारण यांची भूकच भागतच नाही. यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागले आहेत. ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात, त्याला सीमा नसते अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न विचारला असता उध्दव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता, पण तसं झालं नाही. कारण जनता आनंदी होती. सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. त्यानंतर करोना काळात संपूर्ण मंत्रिमंडळाने, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम कार्य केलं. म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं असलं तरी ते मी माझं नाव मानत नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर यांनी सहकार्य केलं नसतं तर मी एकटा काय करणार होतो.

घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत असल्याने मीदेखील घराबाहेर पडत नव्हतो. घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव का आलं? कारण मी लोकांना घराबाहेर पडू नका सांगत होतो आणि लोक ऐकत होते. मी जर तेव्हाही आणि आजही घराबाहेर पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, पूर्वजांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच. मग काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण असं झालं असतं असं सांगत घराबाहेर न पडल्याच्या टीकेला थेट उत्तर देवून टाकले.

ही काळाची गरज होती. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं कळलं तेव्हा साधारण साडे सात ते आठ हजार रुग्णशय्या आपल्या राज्यात होत्या. यामध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर सर्व काही होतं. रुग्णालयात बेड्स, रुग्णवाहिका नव्हत्या, ते सर्व कोणी केलं? कोरोनाच्या चाचणीसाठी राज्यात फक्त दोन प्रयोगशाळा होत्या. त्या आपण ६०० च्या वर नेल्याचेही त्यांनी सांगितले.

विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो. हे असं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं आणि ते यांच्या नशिबी आलं असेल असं वाटत नाही असे सांगत ‘हम तुम एक कमरे मै बंद हो’ असं यांचं मंत्रिमंडळ आहे. त्याचा विस्तार कधी होणार माहिती नाही. पण मंत्री झाले तरी कपाळावर विश्वासघाताचा शिक्का बसलाय तो पुसता येणार नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *