Breaking News

छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती दोन गटातील किरकोळ भांडण

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. रात्री झालेल्या राड्यानंतर पोलिस आयुक्त निखील गुप्ता हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पोलिस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले की, काल रात्री ११च्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरुणांच्या दोन गटांत किरकोळ भांडण झालं. त्यानंतर एका गटातील तरुण निघून गेले. मात्र, काही वेळात या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या एका तासानंतर मोठ्या संख्येने लोक जमायला लागले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली, अशी माहिती दिली.

पुढे बोलताना आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले की, दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना त्यांना रोडवर थांबवणं शक्य झालं नाही. घटनेची माहिती कंट्रोल रुमला मिळाल्यांनंतर माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आम्ही पोलीस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एक-दीड तास हा सर्व प्रकार सुरू होता. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगड फेकले. पोलिसांच्या आणि काही खासगी गाड्या त्यांनी जाळल्या. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली, असंही सांगितले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसचे मराठवाड्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना प्रश्न

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सहभागी राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *