Breaking News

शरिफन…. सआदत हसन मंटो यांच्या कथेचा संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांनी केलेला स्वैर अनुवाद

बाहेर चाललेल्या नरसंहारातून वाचत कासीम कसाबसा घरापर्यंत पोहचला. त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसली होती. त्यामुळे तो तडफडत होता, विव्हळत होता. घराचा दरवाजा उघडताच क्षणी त्याला त्याच्या बायकोचा मृतदेह नजरेस पडला, फातिमा…. जीवाच्या आकांताने ओरडून तिच्याजवळ गेला. उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची तडप आता तो विसरला आणि सूडाने पेटून उठला, त्याला असे वाटत होते, कुऱ्हाड उचलावी आणि बाहेर चाललेल्या नरसंहारात उतरून सगळं, सगळं संपवून टाकावे! तेवढ्यात त्याला त्याच्या मुलीची, शरिफनची आठवण झाली. तो वेड्यासारखा ओरडू लागला, शरिफन… शरिफन… बेटा शरिफन… डरो मत बेटा देखो….देखो…अब्बू आ गए बेटा! शरिफन! समोरच्या खोलीचा दरवाजा बंद होता. कासिमला वाटलं कदाचित घाबरून तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले असेल, दरवाजा वाजवत तो ओरडू लागला, शरिफन! बेटा शरिफन! बेटा डर मत, अब्बू आ गये बेटा, दरवाजा उघड! शरिफन! पण आतमधून उत्तर आलं नाही. कासीमने सर्व ताकदीनिशी दरवाज्याला धक्का मारला दरवाजा उघडून कासिम जमिनीवर आपटला. स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला असं जाणवलं समोर कोणीतरी आहे. दोन फुटावर त्याच्या १४ वर्षाच्या मुलीचं, शरिफनचं नग्न प्रेत पडून होतं, नग्न पूर्णतः नग्न, गोरापान सुडौल बांधा, वर डोकावणारे दोन लहानसे स्तन….
कासीम पुर्णतः बिथरला होता, जोर लावून किंचाळण्याचा प्रयत्नही केला पण त्याचे ओठ एवढे घट्ट मिटले होते की, ती किंचाळी आतल्या आत दबून गेली, डोळ्यांसमोर अंधार झाला, त्याचे डोळे आपोआप मिटल्या गेले तरीही त्याने आपला चेहरा हाताने झाकून घेतला आणि अस्फूट आवाजात पुटपुटला शरिफन! डोळे न उघडता आजूबाजूला चाचपडत हाताला लागतील ते कपडे शरिफनच्या प्रेतावर टाकले, ते कपडे प्रेतावर पडले की नाही हे ही न बघता तो बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने त्याच्या पत्नीचं प्रेतही पाहीले नाही अथवा त्याला ते दिसले नसेल, अशी शक्यताही नाकारता येत नाही. कारण त्याच्या डोळ्यात आता एकच चित्र होतं शरिफनचं…..नग्न शरिफनचं! बाजूला पडलेली कुऱ्हाड त्याने उचलली आणि वाऱ्याच्या वेगाने तो बाहेर पडला.
उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसलेली आहे हे कासीम त्याच्या घरात घुसला होता तेव्हाच विसरून गेला होता. कारण त्याच्यावर एकनिष्ट प्रेम करणारी बायको मारली गेली होती, हा मनावरचा आघात तो काही क्षणातच विसरून गेला होता. आता त्याच्या डोळ्यात फक्त एकच चित्र होत शरिफनच….. नग्न शरिफनचं!
सुनसान रस्त्यावरून कासीम उकळत्या लाव्हासारखा चालत होता. समोरच्या चौकात एक धाडधिप्पाड शीख तरूण येताना दिसला, कासीमने त्याच्यावर असा भयानक हल्ला केला की तो धिप्पाड तरूण एखाद्या झाडासारखा क्षणात कोसळला. कासीम आता रागाने थरथरू लागला, त्याच रक्त उकळत्या तेलात पाणी पडून तडतडू लागावं तसं तडतडू लागलं.
रस्त्यापलीकडे त्याला काही माणसं दिसली, तो त्यांच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने निघाला, कासीमला बघून त्या माणसांनी हर हर महादेव! अशी घोषणा दिली, त्याला प्रतिउत्तर म्हणून घोषणा देण्याऐवजी कासीम त्यांना आई-बहिणीवरून घाण घाण शिव्या देत, कुऱ्हाडीची पकड घट्ट करत त्यांच्या घोळक्यात शिरला. काही क्षणात तीन माणसांचे मृतदेह तडफडत खाली कोसळली. कासीमच्या हल्यातून जे बचावले ते पळून गेले, पण कासिम बंद डोळ्याने कुऱ्हाड बराचवेळ हवेत फिरवत होता, एका मुडद्याला अडखळून कासीम खाली पडला त्याला वाटलं त्याच्यावर सुध्दा हल्ला झाला, तो जोर जोरात ओरडू लागला, मारून टाक मादरचोद! संपवून टाक मला, पण त्याला आपल्या गळ्यावर कुठली पकड किंवा शस्त्राचा घाव जाणवला नाही, तेव्हा डोळे उघडून त्याने पाहिले, तर ते तीन मुडदे आणि स्वतः शिवाय त्याला कोणीही दिसलं नाही. तो निराश झाला कदाचित त्याला मरायचे होते. पण त्याच्या डोळ्यासमोर नग्न शरिफनचं चित्र त्याच्या डोळ्या समोर उभं राहिलं, तो ताडकन उठला बाजूला पडलेली कुऱ्हाड उचलली आणि परत तो रस्त्यावरून उकळत्या लाव्हा सारखा चालू लागला.
कासीम जेवढे रस्ते, बाजार, गल्ल्या फिरला ते सगळे रिकामे होते. बाजूच्या एका गल्लीत घुसला पण त्याचा हिरमोड झाला. कारण ती गल्ली मुसलमानांची होती, तो अजून रागाने फनफनला त्यांना आई-बहिणीवरून शिव्या देवू लागला पण त्याला समाधान मिळत नव्हते. मग त्याने मुलीबाळीवरून शिव्या देत आपला मोर्चा दुसरीकडे वळवला, आता तो वैतागला होता.
बाजुच्या एका घरावर त्याचं लक्षं गेलं घरावर मराठीमध्ये काहीतरी लिहलेलं होतं. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता आता त्याच्या रागाला अजून अग्नी मिळाला. तो सूड भावनेने पेटून कुऱ्हाडीने दरवाजावर प्रहार करू लागला. थोड्याच वेळात दरवाजाचे तुकडे तुकडे झाले. घर अगदी छोटं होतं, घरात प्रवेश करताच आपल्या सुकलल्या घश्यावर जोर देवून ओरडू लागला, ‘बाहेर या भोसडीच्यांनो! मारून टाका मला, नाही तर मरायला तयार व्हा, बाहेर या! शेजारच्या खोलीत त्याला चाहूल लागली कुऱ्हाडीची पकड मजबूत करत तो परत ओरडला, ‘कोण आहे बाहेर या, दरवाजा उघडून एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी बाहेर आली, कासीमचे ओठ बंद झाले, प्रयत्नपूर्वक जोर देवून तिला विचारलं, कोण आहेस?
सुकलेल्या ओठावर जीभ फिरवत मुलगी म्हणाली, हिंदू!
कासीमच्या अंगात सूडाचं भूत संचारलं, ताठ उभा राहिला, हातातली कुऱ्हाड बाजूला फेकून दिली आणि गिधाडासारखी त्या मुलीवर झडप घातली. तिला खोली मध्ये ढकलंल तो स्वतः आत गेला त्याने वेड्यासारखं तिच्यावर आक्रमण केलं, उशी मधून कापूस काढावा तसं तिचे कपडे फाडू लागला….. कासीम अर्धा तास सूडाच्या भावनेन बदला घेण्यात मग्न होता, मुलीने काहीही विरोध केला नाही, कारण ती जमीनीवर पडली तेव्हाच बेशुध्द पडली होती. कासिमने डोळे उघडून बघितलं त्यावेळी त्याची दोन्ही हाताची बोटं त्या मुलीच्या माने भवती घट्ट रूतलेली होती, तो भाणावर येवून बाजूला झाला, त्याला तिच्याकडे बघायची इच्छा झाली, कदाचित त्यामूळे त्याला समाधान मिळेल, त्याने बघितलं त्याच्या लक्षात आलं बाजूलाच एका तरूण मुलीचं प्रेत पडलेलं होत, नग्न पूर्णतः नग्न, गोरीपाण, सुंदर सुडौल बांधा, वर डोकावणारे छोटे स्तन….कासीमचे डोळे बंद झाले, त्याने आपला चेहरा हाताने झाकून घेतला, नसा नसांमधून वाहणारं गरम रक्त गोठून पडलं, एका क्षणात सगळं शांत झालं.
काही वेळात हातात तलवार घेवून एक माणूस आत आला त्याने बघितलं कोणीतरी माणूस डोळे बंद करून थरथरत्या हाताने बाजूच्या वस्तूवर पांघरून टाकतो आहे.
त्याने जोरात विचारलं, ‘कोण आहेस तू?
कासीम दचकला त्यान कोण आहे हे बघायचा प्रयत्न केला. पण त्याच्या डोळ्याने त्याला साथ दिली नाही.
तो माणुस परत ओरडला, ‘कासीम!
कासीम आता जास्तच दचकला, काही अंतरावर असलेल्या माणसाला कासीम ओळखण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते शक्य होत नव्हतं.
हत्यारबंद माणसाने घाबरत विचारले, ‘कासीम, तू इथे काय करतोयस ?
कासिमने थरथरत्या हाताने जमिनीवर पडलेल्या ब्लॅंकेटकडे इशारा केला आणि कोरड्या आवात फक्त एवढंच बोलंला, ‘शरिफन …
पटकन पुढे येवून त्या माणसाने ब्लॅंकेट बाजूला केलं, नग्न प्रेत बघून तो थरथरला, त्याच्या हातातली तलवार गळून पडली, डोळ्यावर हात ठेवून किंचाळला, ‘विमला, आणि धडपडत तो बाहेर निघून गेला.

स्वैर अनुवादक
संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे
: [email protected]

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *