Breaking News
Mantralay
Mantralaya

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच माहितीची चोरी? इन्फोटेक कंपनीच्या एकास अटकः पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या महसूली कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील महसूल विभागात महसूली अधिकाऱ्यांच्या बदली-बढतीचा मोसम सुरु आहे. या मोसमातच मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागातील माहीतीची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यातील संपूर्ण महसूली अर्थात जमिनी, महसूली उत्पन्न अर्थात कर संकलन, रेडीरेकनरमधून मिळणारे उत्पन्न आदींची माहिती मंत्रालयातील महसूल विभागात आहे. त्याचबरोबर महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या बदल्या आणि बढतीची सध्या प्रक्रिया मंत्रालयात सुरु आहे. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून रोज सकाळी किंवा रात्रो कार्यालयीन कामकाजाची वेळ संपली की एक अज्ञात व्यक्ती महसूल विभागात येवून विभागातील संगणकात असलेली माहिती पेनड्राईव्हमध्ये अथवा गरज पडल्यास हार्डडिस्कच घेवून जात होता. सुरुवातीच्या काळात एखाद-दुसऱ्या संगणकामध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे कशामुळे तरी संगणक सुरु नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.
मात्र मंगळवारी एकदम १० ते १५ संगणक नादुरूस्त झाले. तसेच त्या संगणकावर काम करणेही कठीण बनले, तर काही संगणकांना लावण्यात आलेले प्रिंटर्स दुसऱ्याच संगणकाला जोडल्याचे दिसून आले. यासंदर्भात विभागातील कर्मचाऱ्यांनी विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी सदर संगणकामधील बरीच माहिती चोरीस गेल्याची शक्यता गृहीत धरून आणि स्पेअर पार्टची चोरी झाल्याची बाब लक्षात आल्याने महसूल विभागाकडून तात्काळ पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांनीही तात्काळ हालचाल करत मंत्रालयातील संगणकाच्या कामासाठी इन्फोटेक कंपनीकडून आऊटसोर्सींग करण्यात आलेला कर्मचारी वानखेडे यास अटक करण्यात आली.
यासंदर्भात महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा देत पोलिस सदर प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *