Breaking News

महसूल विभागातील संगणक माहिती चोरीमागे बदली-बढतीतील दलालांची लॉबी बदल्यांच्या टेबलवर मंत्र्यांच्या मर्जीतील पदमुक्त न झालेले अधिकारी

मुंबईः खास प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या बढत्या आणि बदल्यांची प्रक्रिया सध्या महसूल विभागात सुरु आहे. मात्र या बदल्या आणि बढत्या प्रक्रिया ज्या टेबलवर सुरु आहेत. त्या टेबलच्या कार्यकक्षेच्या संगणकातील माहितीची चोरी झाल्याने या चोरीमागे दलालांची लॉबींग तरी कारणीभूत नाही ना अशी चर्चा महसूल विभागात सुरु झाली आहे.
महसूल विभागातील ज.१ या डेस्क (टेबल) चे अवर सचिव संतोष गावडे यांच्या अखत्यारीत नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांची आस्थापना आहे. तर दुसरे अवर सचिव आनंदराव माळी यांच्याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची आस्थापना आहे. सध्या नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या बदल्या आणि बढतीची प्रक्रिया सुरु आहे. अपेक्षित ठिकाणी बदली, बढती मिळावी यासाठी राज्यातील अनेक नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी हे आपले कार्यालयीन महसूली कामकाज सोडून या कामासाठी मंत्रालयात ठाण मांडून बसले असल्याची माहिती महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांने सांगितले.
विशेष म्हणजे यातील अवर सचिव आनंदराव माळी यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी माळी यांची महसूल विभागातून भटक्या जाती-जमाती विभागात बदली करण्याचे आदेश दिले. तर गावडे यांचीही विद्यमान महसूल विभागातून इतर ठिकाणी बदलीचे आदेश दिले. तसे आदेशही १३-१४ जून २०१९ रोजी सामान्य विभागाकडून काढण्यात आले. परंतु या दोघांनाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठिशी घातल्याने या दोन्ही अवर सचिवांना महसूल विभागातून पदमुक्त केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय मुंबई उपनगर विभागाचा चार्ज असलेले अवर सचिव कोठेकर यांची तर ८ वर्षे बदलीच झालेली नाही. त्यांच्या बदलीचा कार्यकाल जवळ आला की महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार सचिव हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यानुसार बदली रद्द करत असल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आणि नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढती प्रक्रियेत अर्थ (लक्ष्मी) पूर्ण कामकाज करता यावे यासाठी या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करता विभागातच कार्यरत ठेवण्यात आले आहे. या अर्थ (पूर्ण) कामासाठी मदत होणार आहे. त्यासाठी काही दलालांची टोळी कार्यरत झाली असून या टोळीकडूनच संगणकातील माहिती चोरीचा प्रकार झाला असण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *