Breaking News

विधानसभेसाठी भाजपा-शिवसेनेत झटपट युती होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

बीडः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आधी माध्यमांनी भरपूर चर्चा केली की भारतीय जनता पार्टी – शिवसेना युती होणारच नाही पण आम्ही एका दिवसात युती केली आणि घोषणा केली. आताही विधानसभा निवडणुकीत असेच होईल. तुमच्या लक्षातही येणार नाही, अशी झटपट युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
महाजनादेश यात्रेच्या दरम्यान बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, यात्राप्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस आणि भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेच्या पुढच्या टप्प्यात काही काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक स्वागत करणार आहेत. आम्ही ते स्वीकारणार आहोत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत भाजपाची ‘ओपन डोअर पॉलिसी आहे. तर नेता असेल तर गाळणी लावण्याचे धोरण आहे. आम्ही सगळे नेते पक्षात सामावून घेऊ शकत नाही, पक्षात तेवढी जागाही नाही. जे आवश्यक वाटतात, त्यांच्यासाठी जागा असल्याचेही ते म्हणाले.
महाजनादेश यात्रेचा आतापर्यंत 1641 किमी प्रवास झाला आहे. साठ विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा गेली असून ही यात्रा 150 विधानसभा क्षेत्रांमध्ये व 32 जिल्ह्यात पोहचणार आहे. यात्रेने विदर्भाचा प्रवास पूर्ण केला आहे. नाशिक – नगरचा काही भाग वगळता बाकी उत्तर महाराष्ट्र पूर्ण झाला आहे. कालपासून यात्रा मराठवाड्यात आली. यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य पक्षांच्या यात्रा काढल्या आहेत. त्यांच्या यात्रांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही. काल काँग्रेसने यात्रा सुरू केली. लोकांची गर्दी नसल्याने काँग्रेसला मंगल कार्यालयात यात्रा सुरू करावी लागली आणि सभा छोट्या हॉलमध्ये घ्यावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही दोन यात्रा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा आहे. सुप्रियाताईंनी हा संवाद पंधरा वर्षे सत्तेत असताना केला असता तर ही परिस्थिती आली नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशी संवाद केला जनतेशी केला नाही म्हणून जनतेने त्यांना या परिस्थितीत आणल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
मराठवाड्यात भीषण दुष्काळ स्थिती दिसते. काही जिल्ह्यात दाहकता अधिक आहे. बीड जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. मोठ्या प्रमाणात पीक करपले जाऊ शकते, असे दिसते. या बाबतीत ज्या उपाययोजना त्या सरकार करणारच आहे. या स्थितीचा प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारमुळे चांगले काम झाले आहे. त्यामुळे दुष्काळ असूनही थोडी पिके दिसतात. पण पाऊसच आला नाही तर जलयुक्त शिवारचे साठेही भरू शकत नाहीत. दुष्काळावर शाश्वत उपाययोजना झाली पाहिजे. त्या दृष्टीने वॉटरग्रीड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी नदीत आणून मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीसाठी उपाय सरकार करत असून मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *