Breaking News

श्लेषा आणि बॉबी संवेदनशील लेखक, कलावंत अंकूर वाढवे यांचा महिला दिनानिमित्त खास लघुकथा

गीताबाई ७० वर्षांची म्हातारी आज्जी स्वतः नववारी चापून चोपून नेसते, हातात पाटल्या, बांगड्या, कपाळावर रुपया एव्हढं कुंकू कोरून लावते, डोक्यावरचा पदर हलू देत नाही. गीताबाईचं बालपण तरुणपण परंपरा, संस्कार आणि अत्याचार झेलण्यात गेलं. आपल्या लेकाचं लग्न झालं, सुशिक्षित सून घरात आली, नवी नवरी शहरातली, काही दिवसात गीताबाईला जाणवलं सुनेला साडी मध्ये जरा अडकल्यासारखं होतंय.
गीताबाईने सुनेला बोलवलं आणि सरळ सांगून टाकलं, ‘राधा, तुला साडीची सवय नसेल तर काही घाबरू नको बिनदस्त ड्रेस घाल.
सून बोलली, ‘पण अत्याबाई मामा काय म्हणतील? त्यांना नाही आवडायचं हे.
गीताबाई, ‘तू त्याची काळजी करू नको बाळा त्यांना समजावेन मी, त्यांच्या सोबत ६० वर्ष काढलेत मला समजवता येते त्यांना. आणि गालातल्या गालात हसली.
दुसऱ्या दिवशी पासून राधा सलवार घालायला लागली, त्या दिवशी तिच्या चेऱ्यावर जो आनंद होता. त्यापेक्षा जास्त गीताबाईच्या चेऱ्यावर होता. राधा तेव्हाच काय पण पुढेही कधीच गीताबाईच्या राहणीमानाविषयी काहीच बोलली नाही आणि गीताबाईच्या बोलण्याचा तर प्रश्नच नाही, गीताबाईला जसं जगता आलं नाही ते जगणं ती राधाच्या जगण्यात शोधत होती ही गोष्ट राधा कळून आली होती. वर्षामागे वर्ष गेले, आता गीताबाई जगातून निघून गेली होती .पण ती श्लेषा च्या रूपाने राधाच्या पोटी जन्म घेऊन आली असा राधाचा समज होता, राधाने श्लेषा जन्मली तेव्हाच ठरवलं हिला जसं जगायचं तसं जगू द्यायचं.
श्लेषा मोठी झाली कॉलेजात जायायला लागली आणि तिला फेमिनिजम जवळून बघायला मिळाला. एवढेच नाही तर ती फेमिनिष्ट विचार अंगीकारायला लागली, राधाला ते खूप आवडलं. पण श्लेषाचे आणि राधाचे हल्ली रोज राधाच्या कुंकावरून, बंगड्यावरून भांडणं होत आहेत म्हणे, या आधी राधा फक्त एकदा श्लेषावर ओरडली होती जेव्हा श्लेषा पार्टी करून मित्राच्या आधाराने घरी आली, राधाला श्लेषा च्या पार्टीच काही वाटलं नाही किंवा ती मित्राच्या साह्याने घरी आली याचंही पण आई म्हणून काळजी वाटली म्हणून ओरडली पण श्लेषा राधाला बॅकवर्ड थिंकर म्हणून खूप खूप भांडली.
‘कसं आहे न विचाराने फॉरवर्ड होणं खूप सोप्प असत पण आपल्या विचाराबरोबर दुसऱ्याच्या विचारांचा आदर करणेसुद्धा फॉरवर्ड होऊ शकत नाही का? असा प्रश्न बॉबी ने आपल्या आईला विचारलं तेव्हा तिची आई बोलली, ‘ कोणाला माहीत बाई आपल्याला फक्त एवढं माहीत आहे. गिऱ्हाईक खूष तर आपण खूष! पण तू ह्याचा विचार नको करू अन तुला किती वेळा सांगितलं धंद्याच्या टायमाला तू इकडं नको येत जाऊ, अभ्यास कर आणि मी नाही पडू शकले तू तर पड बाहेर.
बॉबी बोलली, ‘आई, आज महिला दिन आहे न म्हणून शुभेच्छा द्यायला आले होते.
आई, ‘महिला दिन म्हणून कोणता गिऱ्हाईक काही न करता फक्त पैसे देऊन जाते का? महिला दिन आम्हाला नसते बेटा!’

लेखक-अंकुर विठ्ठलराव वाढवे
[email protected]

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *