Breaking News

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस…

मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन सारख्या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारने आणलेल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला. राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू, चेंबूर FCLR लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख आणि डॉ. मनमोहनसिंह यांचे सरकार असताना करण्यात आली, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिली.

मुंबई विभागीय काँग्रेसचे एक दिवसाचे ‘रणशिंग’ प्रशिक्षण शिबिर मुलुंड येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मल्लिकार्जून खर्गे यांनी ऑनलाईन केले, यावेळी ते बोलत होते.

मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना दोन वर्षांपासून तिजोरी लुटण्याचे काम सुरु आहे, महापालिका फक्त भाजपा आमदारांनाच निधी देते. धारावी व मुंबईतील महत्वाचे भूखंड सर्व नियम व अटी बाजूला ठेवून अदानी व भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर श्रीमंतांसाठी आखली जात आहेत. महिला बचत गट व बेरोजगारांना दिलेले स्वच्छतेचे काम काढून मोठ्या कंपनीसाठी टेंडर काढले असून यामुळे ७५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात असून मुंबईतून कोट्यवधींची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पळवली जात आहे. महानंद दुध प्रकल्पही गुजरातच्या हाती सोपवला आहे, याला भाजपाने विरोध केला नाही व त्यासंदर्भात एक शब्दही काढला नाही, अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर मोठ-मोठ्या बाता मारतात आणि विरोधी पक्षांवर आरोप करतात परंतु कॅगच्या अहवालावर ते बोलत नाहीत. कॅग व काही प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार भाजपाने ८.५ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. देश आणि समाजाच्या हिताचे भाजपाला काही देणेघेणे नाही. पक्ष फोडणे, नेत्यांना विकत घेणे हे काम ते करत असतात व आतापर्यंत भाजपाने विविध पक्षातील ४२० आमदारांना विकत घेतले आहे. महाराष्ट्रातही हेच चालले आहे, महायुती सरकारही आमदारांची तोडफोड करुन बनले आहे. महाराष्ट्रातील वातावरण मविआच्या बाजूने आहे. मुंबई व महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जाते हे जनतेपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. घरोघरी जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा आणि विरोधकांचा एकही खासदार जिंकून येणार नाही यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी केले.

शिबिराला मार्गदर्शन करताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेस पक्ष गांधी-नेहरुंच्या आदर्शावर चालतो, काँग्रेसने सर्वजातीधर्मांना सोबत घेऊन काम केले आहे. सोनियाजी गांधींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला व देशासाठी काम केले परंतु आज काही लोक ईडी सीबीआयच्या भितीने पक्ष सोडून गेले. काँग्रेस पक्षाने या लोकांना सर्वकाही दिले परंतु संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा पक्ष सोडून गेले, त्यांना याचा पश्चाताप होईल पण अशा लोकांना कांग्रेस कधीही माफ करणार नाही आणि पुन्हा काँग्रेसमध्येही त्यांना जागा नाही, असे ठणकावून सांगितले.

पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने १० वर्षात कोणतेही विकासाचे काम केले नाही परंतु ‘मोदी गॅरंटी’ अशा जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. २ कोटी नोकऱ्या, परदेशातील काळापैसा आणून १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल, डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, या गॅरंटी मोदींनी २०१४ साली दिल्या होत्या त्याचे काय झाले. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मोदी गॅरंटी अशा जाहिराती देत आहेत. तिसऱ्यांदा निवडून येणार नाही याची नरेंद्र मोदींना खात्री आहे म्हणूनच ते सर्व पक्षातील आयाराम गयाराम यांना जवळ करत आहेत.

आता निवडणुकांचे दिवस आहेत. लोकसभा, विधानसभा व नंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. यावेळी संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. सर्वजणांनी एकजूट होऊन काम केले तर मविआच्या सर्वात जास्त जागा जिंकून येतील असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी शिबिराचे प्रास्ताविक भाषण केले. मीडिया व प्रसिद्धी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन खेरा, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, जेष्ठ पत्रकार निरंजन टकले, काँग्रेस सरचिटणीस अमर खानापूरकर, नेहा राठोरे, नॅशनल वॉर रुमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल यांची व्याख्याने झाली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवक्ते व मुंबई काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *