Breaking News

काँग्रेसचा आरोप, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव मुंबई महानगरपालिका सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात का घेत नाही?

मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती, पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला चालवण्यास देण्याऐवजी स्वतः मुंबई महानगरपालिकेने चालवले पाहिजे पण तसे न करता हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी उपमहापौर व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला.

यासंदर्भात माहिती देताना काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा म्हणाले की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सध्या १५० बेड्स उपलब्ध असून त्यातील १२५ बेड्सच वापरले जात आहेत. या रुग्णालयात केसरी व पिवळे रेशनकार्ड धारक ७० रुग्णांवर दररोज किरकोळ उपचार केले जातात. एका पेशंटवर मुंबई महानगरपालिका ३० हजार रुपये खर्च करते हे लक्षात घेता महिन्याला ९ कोटी रुपये खर्च केला जातो. संपूर्ण १५०० खाटांची रुग्णसेवा सुरु करायची असल्यास महापालिकेला वर्षाला ४५० कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई महानगरपालिकेनेच हे रुग्णालय ताब्यात घेऊन केईएम, नायर, सायन हॉस्पिटलप्रमाणे सुरु ठेवले तर मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचे ठरु शकते.

पुढे बोलताना काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा, सेव्हन हिल्स हॉस्पिटल हे अंधेरीत मोक्याची जागी १६ एकर जागेवर आहे, १५०० बेड्सची क्षमता आहे, बाजारभावानुसार या जागेचे ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये मुल्य होते. हॉस्पिटलच्या शिल्लक असलेल्या जागेत मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु करता येऊ शकते. एम्स सारखे सर्व वैद्यकीय सुविधांनीयुक्त असे हॉस्पिटल होऊ शकते. कोवीड काळात याच रुग्णालयात ६० हजार पेशंटवर उपचार करण्यात आले आहेत. हे रुग्णालय खाजगी कंपन्यांना देण्याचा राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून इच्छुक कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या कंपनीचाही समावेश आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना याआधीही पत्र पाठविले होते पण मुख्यमंत्री शिंदे अथवा आयुक्त चहल यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. राज्य सरकार व मुंबई महापालिकेचा थंड प्रतिसाद पाहता हे रुग्णालय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते असा आरोप केला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *