Breaking News

पदावरून दूर केलेल्या मोपलवार यांची पुन्हा एमएसआरडीसीत नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाचे रजा मंजूर करत पुन्हा रूजू होण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी

शहरातील बोरिवली येथील भूखंड स्वस्तदरात विकण्यासंदर्भात आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असताना त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना पुन्हा आपल्या मूळ पदावर रूजू होण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बजावले आहेत.

मागील पावसाळी अधिवेशनाच्या काळात बोरिवलीतील भूखंड स्वस्त दरात विकण्यासंदर्भात मोबाईलवरील संभाषण आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणाची संभाषण उघडकीस आले. त्यामुळे विधिमंडळात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे अखेर मोपलवार यांना एमएसआरडीसी आणि समृध्दी महामार्गाच्या प्रमुख पदावरून दूर करण्याचा निर्णय घेत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मात्र त्यांचा हा पदावरून दूर राहण्याचा १४५ दिवसांचा कालावधी रजेचा कालावधी मानून सामान्य प्रशासन विभागाने मोपलवार यांची रजा मंजूर करत त्यांना २७ डिसेंबर २०१७ रोजीपासून पुन्हा मुळ पदावर रूजू होण्याचे आदेश बजावले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मोपलवार प्रकरणी चौकशी करणाऱ्या राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या एकसदस्यीय समितीने मोपलवार यांना त्यांच्या आरोपांतून मुक्त करण्याची शिफारस केली होती. तसा अहवाल शासनाकडे सादर झाला होता. या आरोपांसाठी पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी बनावट असल्याचे रासायनिक पृथ्थकरणात स्पष्ट झाले होते. फॉरेन्सिक लॅबने तसा अहवाल चौकशी समितीला पाठविल्याचे कळते. सामान्य प्रशासनाच्या या आदेशामुळे मोपलवार यांना त्या दोन्ही प्रकरणात क्लीनचीट मिळाल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच त्यांना एमएसआरडीसीच्या उपाध्यक्षपदी रूजू होण्यास सांगितल्याची माहिती सामान्य प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली.

मोपलवार यांना पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पास चालना व गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया एमएसआऱडीसीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *