Breaking News

ओमायक्रोनचा अजून अभ्यास झाला नाही, पण आपण डेंजर झोनमध्ये राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम
जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. पण लसीकरणामुळे आपण मास्क घालण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ही चिंतेची बाब असून अद्यापही आपण डेंजर झोन मध्ये असल्याचा गंभीर इशारा राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांनी आज दिला.
आरोग्य विभागानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आणि भारतीयांकडून करोनाच्या नियमांकडे होणारं दुर्लक्ष यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली.
शिवाय, ओमायक्रॉन वेगाने प्रसारीत होणारा व्हेरिएंट असल्यामुळे अवघ्या २० दिवसांत तो ५७ देशांमध्ये पसरला आहे. मात्र, असं असताना दुसरीकडे व्यापक लसीकरण झाल्यामुळे लोकांमध्ये करोनाबाबतच्या नियमाकडे काहीसं दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसून येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात मास्क घालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवं. अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशवासीयांना मास्क न काढण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटना सातत्याने मास्कचा वापर कमी होत असल्याबद्दल सतर्क करत आहे. ओमायक्रॉनचा जागतिक पातळीवर वेगाने होणारा प्रसार चिंता वाढवणारा आहे. मास्क आणि लस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून अद्याप मास्क काढण्याची वेळ आलेली नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि फ्रान्समध्ये करोनाची मोठी लाट आली आहे. करोनाच्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खूप साऱ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणं फार आवश्यक आहे असल्याचे ते म्हणाले.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर चिंता व्यक्त केली जात असताना सध्या अस्तित्वात असलेल्या लसी ओमायक्रॉनवर प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर डॉ. पॉल म्हणाले की, सध्याच्या लसी करोनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील. करोनाचे व्हेरिएंट अजून इतके स्मार्ट झालेले नाहीत की ते लसीमुळे तयार झालेलं सुरक्षा कवच भेदू शकतील.

Check Also

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *