Breaking News

ब्रिटन कोरोना स्ट्रेनचे रूग्ण मुंबईसह महाराष्ट्रातही सापडले नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी

ब्रिटनमधून आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या ८ प्रवाशांना कोरोना स्ट्रेनची धक्कादायक माहिती पुढे आली असून यातील ५ रूग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुणे, मीरा भायंदर आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रूग्ण असल्याचे एकात्मिक साथ रोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले. या संसर्ग विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिक दक्षता घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली  तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात.  त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले.

बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *