Breaking News

मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख

सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. परंतु खरंच द्राक्षबागेच्या छाटण्या मुहूर्तावर घेऊन विशेष फायदा होतो का ? याचा कुठेतरी आणि कधीतरी विचार होणे गरजेचे आहे. कारण मुहूर्तावर छाटण्या घेतल्याने बऱ्याचदा नुकसानच होत असल्याचे शेतकऱ्यांच्या अनुभवातून आणि एकंदरीत बाजारपेठेतील परिस्थितीवरुन लक्षात येत आहे. कारण आपल्याकडील बरेच द्राक्षशेतकरी एखादा चांगला मुर्हूत पाहून एकाच दिवशी सरसकट छाटण्या घेताना दिसतात. साहजिक एकाच मुहूर्तावर, एकाच दिवशी शेतकऱ्यांनी छाटण्या घेतल्याने त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.
आता शेतकऱ्यांनी मुहूर्तानुसार एकाच दिवशी छाटण्या घेतल्याने त्याभागातील द्राक्षबागेची वांझ काढणे, घडबुडवणी यासारखी कामे एकाच टप्प्यात येतात.त्याचा परिणाम म्हणून त्याकाळात शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण होऊन त्यांची ताराबंळ उडते, त्यातच शेतमजूरांकडून शेतकऱ्यांची जादा मजुरीवरन एकप्रकारे आर्थिक कोंडी केली जाते.त्यात शेतकऱ्यांचे संपुर्ण बजेटच कोलमडून जाते, परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच खराब हवामानात एकाच टप्प्यात असलेल्या द्राक्षबागांवर रोगांचे संक्रमण होऊन द्राक्षबागांच्या नुकसानीचा टक्का देखील वाढतो. तसेच औषधांचा खर्च देखील अधिक होतो.
ही झाली प्रत्यक्ष द्राक्षबागेतील स्थिती, मार्केटमधील स्थितीतर याहून अधिकच बिकट. साधारण एकाच टप्प्यात द्राक्षबागेच्या छाटण्या झाल्याने, द्राक्षफळ काढणी देखील एकाच काळात येते. त्यामुळे मार्केटमध्ये अचानक मालाची आवक वाढते, साहजिक मालाची आवक एकदम वाढल्याने, द्राक्षदरात मोठी घसरण होऊ लागते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन द्राक्ष दलालांकडून देखील शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात पिळवणूक केली जाते. त्यात द्राक्षफळ हे संवेदनशील असल्याने जास्तीकाळ बागेत शेतकरी ठेवू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील नाईलाजाने मिळेल त्या दराने द्राक्षमाल व्यापाऱ्याला विकावा लागतो. या सर्व परिस्थितीचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला थोड्याफार फरकाने आलेला असणारच आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी केवळ डोळेझाक पणे, मुहूर्तावर अवलंबून राहत, “असेल माझा हरी, तर आणून देईल खाटल्यावरी” ही वृत्ती सोडून, गाऊंड रिअॅलिटीला धरुन वागायला हवे. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी परस्परांत सुसंवाद ठेऊन, उपलब्ध मजूरांचे, वातावरणाची स्थिती तसेच मार्केटमधील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन द्राक्ष छाटणीचे नियोजन करायला हवे तरच यापुढील स्पर्धेच्या काळात आपला द्राक्षशेतकरी तग धरु शकेल.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *