Breaking News

देशातील पहिले ”मधाचे गाव” प्रकल्पाचा ”मांघर” गावी शुभारंभ राज्यातील इतर जिल्ह्यात मधाचे गाव प्रकल्प राबविण्यात येईल-मंत्री सुभाष देसाई

मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिंन्हा, उप मुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, प्रांताधिकारी संगिता चौगुले, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सरपंच यशोदा संजय जाधव आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने  प्रकल्प मधमाशी राबवून त्याअंतर्गत मांघर या पहिल्या मधाच्या गावाचा अधिकृतपणे प्रारंभ होत आहे. या गावातील ८० टक्के लोकांची उपजिवीका ही या मधाच्या उद्योगावर अवलंबून आहे. यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. मध हे आरोग्यासाठी लाभदायक असून पुढील पिढी सुदृढ रहावी यासाठी  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून शालेय पोषण आहारामध्ये लहान मुलांना एक चमचा मध देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

जगात मधामाशांची संख्या कमी होत चालली आहे. ती वाढविण्यावर भर द्यावा. वन विभागाने वनस्पतींची  संख्या वाढवावी, जेणेकरुन मध संकलनासाठी उपयोग होईल. हा एक शेतीपुरक व्यवसायही ठरु शकतो. मधमाशांमुळे निसर्गातील समतोल राखला जातो. तसेच फुलांच्या परागीकरणामुळे पीक उत्पादनात वाढ होते. या संकल्पनेमुळे बाजारात शुध्द मध उपलब्ध होईल. खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून  शेतकऱ्यांना प्रोत्साहन, प्रशिक्षण  आणि सहाय्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे  म्हणाल्या, पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत मांघर गावाची प्रसिध्दी करावी.  येथे येणाऱ्या  पर्यटकांना इथल्या मधुमक्षी पालन कशापध्दतीने केले जाते, मधावर कशा पध्दतीची प्रक्रिया केली जाते याची माहिती त्यांना घेता येईल.  त्याच बरोबर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी आमदार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा मांघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

नाबार्ड देणार चालू वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रासाठी नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published.