Breaking News

रेमोचा सहायक अॅण्डीची लपवाछपवी वर्षभरात केलं चित्रपटाचं दिग्दर्शन

मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲण्डी एक दिवस अचानक गायब झाला. उत्कृष्ट डान्सर असलेला, सुपरस्टार रजनीकांत, सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन ते अगदी अलिकडचे वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पर्यंत सर्वांना व्यक्तिगत नृत्याचे धडे देणारा आणि रेमो डिसोजाचा उजवा हात म्हणून फिल्म इंडस्ट्रीत ओळखला जाणारा ॲण्डी संपूर्ण ग्रुपमध्ये कुणालाच काहीही न सांगता २०१७ पासून काम सोडून गेला. रेमोने अनेकांकडे त्याच्या न येण्याबद्दल विचारले, पण कुणालाच त्याचा थांगपत्ता नव्हता. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण नंबर बदललेला होता. त्यामुळे हतबल झालेल्या रेमोने अखेर त्याचा नाद सोडला, पण अत्यंत हुशार आणि विश्वासू सहकारी असल्याने रेमोचे मन त्याला सतत बेचैन करत होते.

अखेर वर्षभरानंतर म्हणजे फेब्रुवारी २०१८ मध्ये ॲण्डीने गुरूवर्य रेमोसरांना फोन केला. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रेमोनेही त्याला तातडीने बोलावून घेतले. रेमो काही बोलण्याच्या आधी तो गुरू रेमोच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, “सर! मैने एक फिल्म डीरेक्ट की है| सालभर उसमेंही व्यस्त था|” ॲण्डीचे हे वाक्य ऐकून रेमोची अवस्था म्हणजे ‘जोरका झटका धीरेसे लगे’ अशीच झाली. अचानक गायब झालेला जीवाभावाचा सहकारी वर्षभर काहिही थांगपत्ता लागू न देता सिनेमाचे दिग्दर्शन करत होता, हे समजल्यावर रेमो काही क्षण नाराज झाला, पण त्याच क्षणी आपला विश्वासू शिष्य आपल्याच पावलावर पाऊल ठेवून चाललाय या गोष्टीचा त्याला आनंदही झाला. कारण रेमो हा अतिशय सहृदयी माणूस आहे. त्याच बरोबर रेमो डिसोजा यांना ॲण्डीचे एक स्वभाव वैशिष्ट्यही चांगलच माहित आहे. ॲण्डी म्हणजेच आनंदकुमार कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय जवळच्या व्यक्तींना कळू देत नाही. कारण ती गोष्ट कळली की पूर्ण होत नाही, अशी ॲण्डीची एक धारणा आहे. त्यामुळेच त्याने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली असल्याने रेमो डिसोजाने न रागवता त्याला मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या.

रेमोने त्याला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले आणि तातडीने चित्रपट दाखविण्यासाठी सांगितले. पूर्णत: तयारीनिशी गेलेल्या ॲण्डीने रेमोला सिनेमा दाखवला. हा सिनेमा म्हणजे येत्या ३० मार्च रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ‘गावठी’ आहे. आनंदकुमार उर्फ ॲण्डी हा वयाच्या चौथ्या वर्षी कुटुंबासह तामीळनाडू येथून मुंबईत मुंलुंड येथे स्थायिक झाला. मुलुंडच्या वाणी विद्यालयात त्याने दहावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. कारण प्रभुदेवाच्या डान्स स्टाईलने झपाटलेला ॲण्डी रोज टीव्ही लावून एकलव्याप्रमाणे गुरू प्रभुदेवाकडून नृत्याचे धडे गिरवत होता. रोज सकाळ-संध्याकाळ केवळ अंगात संचारल्याप्रमाणे ॲण्डी नाचतच राहायचा. चार वर्षे त्याने भरपूर स्ट्रगल करून कसेबसे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा यांच्या ग्रुपमध्ये साईड डान्सर म्हणून स्थान मिळविले. पण नंतर ॲण्डीने मागे वळून पाहिलेच नाही. साईड डान्सर, डान्स ट्रेनर, असिस्टटन्ट कोरीयोग्राफर ते बड्या सुपरस्टार्सना तो व्यक्तिगत डान्स स्टेप शिकवू लागला. रेमो यांनी दिग्दर्शित केलेल्या ए बी सी डी,  ए बी सी डी-२ आणि फ्लाईंग जाट या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. संपूर्ण आत्मविश्वास आल्यावर त्याने कथालेखक आणि निर्माते सिवाकुमार रामचंद्रन यांच्या ‘गावठी’ ह्या कथेवर पटकथा रचली आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *