Breaking News

पद्मश्री लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दु:ख

सातारा-मुंबई : प्रतिनिधी

मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्‍या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणार्‍या यमुनाबाई वाईकर या बर्‍याच दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर वाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यमुनाबाई यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी स्वत:चा तमाशा फड काढला होता. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर आख्खा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या. ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्यांची दखल घेवून महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी ऍवार्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सुमारे बावीस राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. मराठी तमाशा क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे. अशा या सातारच्या भूमितील थोर लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने आपले संपूर्ण आयुष्यच कलेसाठी अर्पण केले होते. आयुष्यात आलेल्या अनेक खडतर मार्गांना, प्रसंगांना अतिशय समर्थतेने तोंड देत त्यांनी आपल्या कलेची जोपासना केली. अखेर ज्या कृष्णाकाठी त्यांचा जन्म झाला, त्याच कृष्णाकाठी आज त्या विसावल्या.

राज्याने दोन देदीप्यमान रत्ने गमावली– राज्यपाल

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध वारली चित्रकार जिवा सोमा म्हसे आणि लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याने आज दोन देदीप्यमान रत्ने गमावली आहेत. पद्मश्री जिवा सोमा म्हसे यांनी आपल्या सुबक चित्रांमधून आदिवासी समाजाचे जीवन व चालीरिती जगापुढे आणल्या. एका समृद्ध परंपरेच्या माध्यमातून प्राप्त झालेले वारली चित्रकलेचे ज्ञान त्यांनी आपल्या अंगभूत प्रतिभेने आणि प्रयोगशीलतेने वृद्धिंगत केले. जिवा सोमा म्हसे वारली चित्रकलेचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्यांची कला जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

एक निस्सिम कला उपासक गमावला- मुख्यमंत्री

लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कला उपासक आपण गमावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. लोकनाट्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोठे योगदान असणाऱ्या यमुनाबाईंचे कलावंतांच्या नव्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *