Breaking News

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था ‘वाऱ्यावरची वरात’ सारखी अकादमीला पूर्णवेळ संचालकच मिळेना

मुंबई : खंडूराज गायकवाड

महाराष्ट्रातील संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था सध्या पुलं च्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाच्या नावाला शोभेल अशी झाली आहे. कारण सध्या या अकादमीला पूर्ण वेळ प्रकल्प संचालक मिळत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला.

गेले अनेक वर्षापासून पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाला पूर्ण वेळ अधिकारी काम करायला मिळत नव्हते. परंतु माध्यमातून अनेक वेळा याबाबत टीका झाल्यावर सांस्कृतिक कार्य खात्याने दोन्हीकडे पूर्ण वेळ अधिकारी देण्याचा प्रयत्न केला.

संजय पाटील यांच्याकडे काही महिने अकादमीचा कार्यभार होता. परंतु त्यांच्या नंतर  प्रकल्प संचालक म्हणून आँगस्ट २०१७ मध्ये संजीव पलांडे यांच्याकडे पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अकादमीच्या कामात सुसूत्रता आणून शासनाला महसूल वाढवून दिला. विविध उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविले. परंतु महिन्याभरापूर्वी अचानक पलांडे यांच्याकडून हा कार्यभार काढून पुराभिलेख संचालनालयाचे सुशिल गर्जे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. परंतु गर्जे हे जास्तीत जास्त आपल्या पूर्ण वेळ असलेल्या कामाकडे लक्ष देत असल्याने पु.ल.देशपांडे अकादमीच्या यावर्षीच्या अनेक महोत्सवाला खिळ बसली. यावर्षी थांबलेले उपक्रम झाले नाही तर, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात शासनाच्या तिजोरीत परत जाण्याची शक्यता आहे.

आता जोपर्यत या अकादमीचा पूर्णवेळ प्रकल्प संचालक येत नाही. तो पर्यत मात्र या अकादमीची अवस्था पुलं देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाच्या नावाला शोभेल अशी झाली आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *