Breaking News

आईच्या अश्रूंनी मुलाला दिली अभिनयाची संधी

मुंबई : प्रतिनिधी
चित्रपटसृष्टीत काम करण्याची एक संधी मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो हे आजवर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुखातून आपण ऐकत आलो आहोत. चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळवण्यासाठी बालकलाकारांमध्येही आज कमालीची स्पर्धा वाढली आहे. आपलंही मूल रुपेरी पडद्यावर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी पालक बराच खटाटोपही करतात. ‘घाट’ या आगामी मराठी चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या दत्तात्रेय धर्मे या मुलाच्या आईने त्याला चित्रपटात संधी मिळावी यासाठी अश्रूही गाळले.
निर्माते सचिन जरे यांनी जरे एंटरटेन्मेंट या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत ‘घाट’ची निर्मिती केली आहे. राज गोरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनीच कथा, पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. या चित्रपटात राज यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या तिर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर राहणाऱ्या कुटुंबाची कथा सादर केली आहे. या चित्रपटाची कथा यश कुलकर्णीने साकारलेल्या मन्या नावाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. मन्याच्या मित्राची म्हणजेच पप्प्याची भूमिका साकारण्यासाठी राज एका मुलाच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी ऑडिशन्सही घेतल्या, पण त्यांना हवा असलेला मुलगा मिळत नव्हता. एक दिवस इंद्रायणीच्या घाटावर फिरत असताना एक माऊली आपल्या मुलाला घेऊन राजपाशी आली. “काहीही करा पण माझ्या मुलाला चित्रपटात घ्या”, अशा आर्त स्वरात हात जोडून ती राजकडे विनवणी करू लागली. विनवणी करता करता त्या माऊलीचे डोळे अश्रूंनी पाणावले. हे राज यांना पाहावलं नाही आणि त्यांनी पप्प्याच्या भूमिकेसाठी दत्तात्रयला घेण्याचं निश्चित केलं. पहिलाच चित्रपट असूनही दत्तात्रयने राज गोरडे, मनोज डोळस तसंच इतर सहकाऱ्यांच्या साथीने पप्प्याची व्यक्तिरेखा सजीव केली. आपल्यालाही कोणीतरी ब्रेक दिल्यानेच इथपर्यंत पोहोचू शकल्याची जाणिव असल्यानेच अभिनय येत नसूनही दत्तात्रेयला संधी दिल्याचं राज यांचं म्हणणं आहे. दत्तात्रेयच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंनी अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे काहीही झालं तरी त्याला अभिनय शिकवायचा असं ठरवलं. त्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करीत छान काम केलं असल्याचं राज म्हणाले. दत्तात्रेय हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावातील आहे. सध्या पुण्यात राहणाऱ्या दत्तात्रेयला क्रिकेटचीही आवड आहे. आई-वडीलांप्रमाणेच दत्तात्रेयही वारकरी आहे.
मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी कास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील प्रोडक्श्न मॅनेजर आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *