Breaking News

“तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी
देखणा चेहरा, मधुर वाणी, मनमोहक अभिनय आणि सहजसुंदर देहबोलीच्या बळावर पाच दशकांहूनही अधिक काळ सिनेसृष्टीची सेवा करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७९) यांनी आज या जगाचा निरोप घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर हा परिवार आहे.
१८ मार्च १९३८ रोजी कपूर घराण्यात जन्मलेल्या शशी कपूर यांनी वडील पृथ्वीराज कपूर आणि थोरले बंधू राज कपूर व शम्मी कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाचा वारसा जपला. सहजसुंदर अभिनयाच्या बळावर शशी यांनी जणू त्या काळातील तरुणींवर जादूच केली होती. एका मागोमाग हिट चित्रपट देत त्यांनी अभिनय कारकिर्द यशस्वीपणे सुरू ठेवली. आग, संग्राम, आवारा या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटाने शशी कपूर यांना नवी ओळख देत नायकाच्या रूपात जगासमोर आणले. त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी १७५ चित्रपटांमध्ये अभिनय केला. या दरम्यान सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्मात्याच्या भूमिकेतूनही शशी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १९९१ मध्ये आलेल्या ‘अजूबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. १९७८ ते १९९१ या काळात त्यांनी जुनून, कलयुग, ३६ चौरींगी लेन, विजेता, उत्सव आणि अजूबा या चित्रपटांची निर्मितीही केली. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल २०११ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण देऊन गौरव केला होता. याशिवाय दादासाहेब फाळके, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर यांसारख्या पुरस्कारांवरही शशी कपूर यांनी आपले नाव कोरले आहे.
आपल्या सशक्त अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ रूपेरी पडदा गाजविणाऱ्या शशी कपूर यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या निधनामुळे आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीवर वेगळी ठसा उमटविणारे अभिनेते आपण गमविले आहेत. शशी कपूर नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा, घरंदाजअदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. प्रामाणिकलाघवीशांतसंयमी अशा विविध भूमिकेतून ते रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दात शशी कपूर यांच्याप्रती शोक व्यक्त केला. 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *