Breaking News

विद्युत जमवाल बनणार जंगली थायलंडमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता निशिकांत कामतच्या ‘फोर्स’ या हिंदी चित्रपटामध्ये नायकाला टोकाची टक्कर देणारा खलनायक साकारत लक्ष वेधून घेणारा अभिनेता विद्युत जामवाल सध्या खलनायकी भूमिकांसोबतच नायक, सहनायकाच्या भूमिका साकारण्यात व्यग्र आहे. ‘कमांडो’ आणि ‘कमांडो २’मध्ये नायक बनलेल्या विद्युतच्या ‘जंगली’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या चित्रपटाचं शुभारंभाचं चित्रीकरण शेड्युल सध्या थायलंडमध्ये सुरू आहे. ‘जंगली’ हा सध्या सुरू असलेल्या चित्रपटांच्या ट्रेंडपेक्षा खूप वेगळा असल्याचं चित्रपटाशी निगडीत असलेल्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. अॅक्शन-थ्रीलर असलेल्या या चित्रपटात माणूस आणि हत्ती यांच्यातील नातेसंबंध पाहायला मिळतील. या चित्रपटात विद्युत एका चिकित्सकाच्या भूमिकेत दिसणार आहे. घरी परतत असताना त्याचा सामना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिकाऱ्यांशी होतो. त्यांचा सामना तो कशा प्रकारे करतो त्याचं चित्रण ‘जंगली’मध्ये पाहायला मिळणार असल्याचं समजतं.
हा चित्रपट पुढल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ ऑक्टोबर २०१८ प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हॉलिवुड दिग्दर्शक चक रसेल करीत आहेत. विद्युतने आजवर विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांमध्ये नेहमीच वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणामुळे तो जेव्हा एखादा नवीन चित्रपट साईन करतो, तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याकडे वळतात. ‘जंगली’ हा चित्रपटच मूळात लक्ष वेधून घेणारा आहे. जुन्या काळातील शम्मी कपूर यांच्या ‘जंगली’शी या चित्रपटाचा काहीही संबंध नसला, तरी शीर्षकावरून तरी त्या सुपरहिट संगीतप्रधान चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पुढल्या वर्षी प्रदर्शित होणारा विद्युतचा ‘जंगली’ प्रेक्षकांवर जादू करण्यात कितपत यशस्वी होतो ते येणारा काळच ठरवेल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *