Breaking News

१६ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवास सुरुवात मराठीबरोबरच इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांग्लादेशी चित्रपटांची मेजवाणी

मुंबई : प्रतिनिधी

एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या ‘थर्ड आय आशियाई’ चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर, पु.ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पालांडे, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू व मुलगी शेफाली साधू, दिग्दर्शक केदार वैद्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चित्रपट लेखक अरुण साधू यांच्या ‘झिपऱ्या’ या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेल्या केदार वैद्य दिग्दर्शित ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.

याप्रसंगी अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. या महोत्सवाला रसिकांनी जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी ‘थर्ड आय’ आशियाई’ चित्रपट महोत्सवाचं १६ वर्ष धोक्याचं न ठरता दृढ प्रेमामुळे उत्तरोत्तर वाढेल असा विश्वास व्यक्त केला. अरुण साधू तसेच त्यांच्या ‘झिपऱ्या’ कादंबरीच्या आठवणींना शेफाली साधू यांनी उजाळा दिला. दिग्दर्शक केदार वैद्य यांनी चांगली कलाकृती करायला मिळाल्याचं समाधान व्यक्त करताना साधू कुटुंबियांचे व झिपऱ्याच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

यंदाच्या ‘थर्ड आय’ आशियाई’ चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवात भारत, इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांग्लादेश या देशातील चित्रपटांबरोबरच आठ मराठी चित्रपट मुख्य विभागात पाहायला मिळणार आहेत. तसेच महोत्सवाच्या ‘युरोपियन कनेक्शन’ या विभागात हंगेरियन दिग्दर्शक झोल्तन फाब्री यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त चार हंगेरियन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सत्यजित राय यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा ‘जनअरण्य’ चित्रपट दाखविला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे लघुपट स्पर्धा या वर्षीही असून त्यात पंचवीस लघुपट दाखवले जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांनी केले आहे.

Check Also

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *