Breaking News

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी दिली.

राज्यातील कृषी क्षेत्रातील विविध प्रश्न आणि राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कामाच्या अनुषंगाने भाजपचे डॉ.अनिल बोंडे यांनी २९३ अन्वये प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्यावरील झालेल्या चर्चेत जवळपास सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील ३० सदस्यांनी आपली मते मांडत प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री फुंडकर यांनी वरील आश्वासन दिले.

राज्यातील जवळपास  १२० तालुके बोंडअळीने बाधीत झाले आहेत. एकूण  ४० लाखा हेक्टर पैकी ९ लाख ४० हेक्टर जमिनीवरील कापसावर बोंडअळीचा हल्ला झाला. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संकरीत बियाणे तयार करून त्याची विक्री करण्याबाबत केंद्राला पत्र लिहीले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मुदत संपलेली आणि तण वाढीस मदत करणाऱी बियाणे विकल्याप्रकरणी औरंगाबाद येथील मन्सेन्टो आणि महिकोची गोदामे सील करून त्यांच्यावर न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदतही मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कृषी विद्यापीठे आणि विभाग अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृषी विभागातील सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या जागाही भरण्यात येणार असल्याचे सांगत राज्यातील ५० बोगस कृषी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी मंत्र्यांच्या या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नेमकी मदत किती देणार असा सवाल केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही एचटी कॉंटन कंपनीची प्रमाणित नसलेली बियाणेही राज्यात विकण्यात आली आहेत. त्या कंपीकडून मदत कशी मिळवून देणार असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी हस्तक्षेप करत प्रत्येक शेतकऱ्यांची वेगळी मदत असणार आहे. मात्र ही मदत एकदाच नाही. तर सरकारकडून, विमा कंपन्यांकडून आणि बियाणे उत्पादन कंपन्यांकडून अशी तीनवेळा मदत देण्यात येणार आहे. बोंडअळी आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण होत आले असून याबाबत लवकरच सभागृहात त्याची माहिती देणार असल्याचे जाहीर केले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *