Breaking News

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु होती. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत काही घडामोडी घडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी बाबतची भूमिका जाहिर केली.

यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो कायम आहे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. देशात आणि राज्यात ईदी अमिनचे हुकूमशाही राज्य सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच गिळण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्षांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी तयार आहे. आजच्या दिवसात ती प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आपले जागावाटप पूर्ण केले असल्याचेही यावेळी सांगितले.

शिंदे गटावर आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, जागावाटपाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही नाही. त्यांचे दिल्लीतील नेते जे सांगतील, ज्या जागा देतील, त्याच त्यांना मिळतील. पूर्वी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा होत असत आणि मातेश्रीतूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदे, अजित पवार यांना दिल्लीत जावे लागते. छत्रपती उदयनराजे यांनीही दिल्लीत जावे लागते. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीने एकत्रितपणे राज्यातच निर्णय घेतला. आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठा नाही. ब्रिटीश आणि मोगल काळात मांडलिक, संस्थानिक यांना जे स्थान होते, तेच अजित पवार आणि शिंदे यांचे महाराष्ट्रात आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत, हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाहीत. ते मांडलिक आहेत. त्यांना वारंवार दिल्लीत जाऊन भाजपा नेत्यांच्या हिरवळीवर बसावे लागते. इकडे येताना त्यांच्या कपड्यांवर तेथील गवत दिसते, अशी खोचक टीकाही यावेळी केली.

३१ मार्चला इंडिया आघाडीची होत असलेल्या रॅलीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, रामलीला मैदानावर ३१ तारखेला हुकूमशाहीविरोधात महामेळावा होणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या प्रकारे अटक केली. त्यावरून देशात हुकूमशाहीचे राज्य आहे, असे दिसून येते. या हुकूमशाहीविरोधात देशभरातील नेते एकत्र येणार आहेत. या प्रकरणात खोटे, पुरावे, बनावट खटले दिसून येत आहेत. या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही यावेळी सांगितले.

Check Also

शरद पवार म्हणाले, बारामतीतील निवडणूकीची अमेरिकेतही उत्सुकता…

ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *