Breaking News

राज ठाकरे यांची टीका, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचय म्हणून वाटेल ते…

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून पक्षसंघटना मजबूतीसाठी त्यांच्या पक्षवाढीसाठीच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपासह शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, वरती केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरु आहे ते चूकच आहे. आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात? अशी टीका भाजपावर केली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या व्यासपीठावर दोन पक्षांचे प्रतिनिधी एकत्र आले म्हणजे युत्या, आघाड्या झाल्या असं होत नसतं. माझे नेते आणि मी महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेत आहोत, तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहोत. जे काय सांगायचं ते योग्य वेळ आली की सांगेनच असे सांगत आघाडी संदर्भात लवकरच घोषणा करणार असल्याचे सूचक वक्तव्य केले.

राज ठाकरे यांनी राज्यातील सद्यपरिस्थितीवर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे तसा मी ह्या आधी कधीच पाहिला नव्हता. आता जनतेनेच ह्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे, अन्यथा ह्यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. आणि जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल अशी शक्यताही वर्तविली.

याशिवाय राज्यातील मराठा आरक्षण आणि निवडणूक घोटाळ्याप्रकरणी राज ठाकरे म्हणाले की, मी जे आधी बोलतो ते कालांतराने लोकांना पटतं. मी जे बोलतो ते कायम विचारपूर्वक बोलतो. मराठा आरक्षणाबद्दल मी आधीच बोललो होतो, तसंच मतदान पण ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घ्या हे मीच आधी बोललो होतो. जगभरात सर्वत्र जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतात ईव्हीएमवर का हा माझा प्रश्न तेंव्हाही होता आणि आज पण आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मतदान झाल्यावर तुम्हाला एक स्लिप येणार, त्याचं काय झालं ? असा सवालही केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि केंद्रातील भाजपा सरकारला केला.

राज्यातील पाणी प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण आहे, अनेक भागांत दुष्काळ आहे, ह्या सगळ्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्रात मराठी मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळत नसेल त्यांना नोकऱ्या मिळत नसतील आणि महाराष्ट्र इतकं समृद्ध राज्य असून जर असं होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे सांगत वाढत्या बेरोजगारीवर अप्रत्यक्ष बोट ठेवले.

शरद पवार यांच्या रायगड दौऱ्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत. महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं म्हणून ते बहुधा त्यांचं नावच घेत नव्हते आणि आता अचानक त्यांना महाराजांची आठवण येत आहे असा उपरोधिक टोला लगावला.

तर काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे समर्थक माजी नगरसेवकावर गोळीबार केल्याप्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले की, आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, एखादा माणूस इतक्या थराला का जातो ह्याचा विचार पण करावा लागेल. इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची स्थिती कोणी आणली ह्याची पण चौकशी व्हावी अशी मागणी करत अप्रत्यक्ष भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संशयाचा अंगुली निर्देश केला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *