Breaking News

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार ११ मे रोजी पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय नेते नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेतील, अशी माहिती जद(यू.) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली.

नीतीश कुमार यांच्या सोबत बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि बिहार सरकारचे मंत्री संजय कुमार झा असणार आहेत. देवेशचंद्र ठाकूर यांनी नुकतीच मुंबईत आमदार कपिल पाटील यांच्या सोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती.

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नीतीश कुमार देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि आज ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली.

मुंबईत ‘मातोश्री’ वर नीतीश कुमार उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे. ते नीतीश कुमारांनी स्वीकारलं आहे. ‘मातोश्री’ भेटीनंतर नीतीश कुमार ‘सिल्वर ओक’ वर शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करतील.

मुंबई विमानतळावर आमदार कपिल पाटील जनता दल (यूनाइटेड) च्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत नीतीश कुमार यांचं स्वागत करतील. कलानगरच्या चौकात जद(यू.) च्या कार्यकर्त्यांकडून नीतीश कुमार यांचं स्वागत होईल.

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा, सुशासन आणि संयमी नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. बिहारचा त्यांनी कायापालट केला. महिलांना सुरक्षित केलं. तरुणांना आशा दिली. आता देशाला नीतीश कुमार यांचा इंतजार आहे. देश माँगे नीतीश ही घोषणा देशभर घुमते आहे. नीतीश कुमार यांचा मुंबई दौराही ऐतिहासिक ठरेल. देशाच्या राजकारणाला वेगळं वळण त्यातून मिळेल, अशा भावना आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *