Breaking News

या मागण्यावरून बीडीडी चाळकऱ्यांचा निवडणुकांवर बहिष्कार

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थानिक अधिकृत दुकानदारांवर अन्याय होत असल्याने त्यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार संघटनेने यासाठी क्रमबद्ध आंदोलनाची रूपरेषा आखली असून पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

बी.डी.डी. चाळ दुकानदार संघटनेची वरळी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला जवळपास ३५० व्यावसायिकांनी हजेरी लावली. संघटनेने सांगितले की, एकीकडे बी.डी.डी चाळ पुनर्विकास होत असल्याचा सर्वांनाच आनंद आहे. या पुनर्विकास प्रकल्पात अनधिकृत स्टॉलधारक, झोपडपट्टीतील रहिवाशी, स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांचा सरकारने विचार करुन त्यांचे समाधानकारक पुनर्वसन केले. मात्र दुसरीकडे अधिकृत दुकानांवर अन्याय केला जात असून त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. संघटनेने सप्ष्ट केले की, रहिवासी गाळे धारकांना १६० चौरस फुट ऐवजी ५०० चौरस फुटाची निवासी घर देण्याचे राज्य शासनाने कबूल केले असताना दुकानदारांना १६० चौरस फुट जागेच्या बदल्यात तेवढीच जागा नवीन प्रकल्पात मिळणार आहे. शिवाय या बदल्यात केवळ २५ हजार एवढेच मासिक भाडे देण्याचे कबूल करण्यात आले आहे. हा अन्याय आहे. वरळी परिसरात ४० हजार मासिक भाडे असताना २५ हजाराचा तुटपूंजा मोबदला देऊन जबरीने दुकान सोडण्यास बाध्य केले जात आहे.

नवीन ठिकाणी जाऊन व्यवसाय उभारणे, खिशातून भाडे भरणे, कामगारांचे वेतन देऊन घर चालविणे ही सगळी तारेवरची कसरत व्यावसायिकांना करावी लागणार आहे. यामुळे किमान ३०० चौरस फुटाची जागा, स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत आदी मागण्या शासनासमोर ठेवल्या आहे. स्थानिक व्यावसायिकांच्या समस्या ऐकण्यासाठी अनेकदा शासनास विनंती करण्यात आली मात्र कोणतीही दाद मिळत नसल्याने पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल, दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा देऊन धरणे आंदोलन करणे व नंतर शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे, उपाध्यक्ष डॉ. विकास दुबेवार, सचिव राजेश गुप्ता, उपसचिव डॉ. अशोक मौर्य, खजिनदार ललितभाई छेडा व प्रमुख सल्लागार डॉ. अश्विनी राऊत, डॉ.कुमार दुस्सा, किरण शेट्ये, विशाल भोसले यांनी घेतला आहे.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *