Breaking News

आशिष शेलार म्हणाले, असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून काय… पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुनावले

भाजपा आणि शिवसेनेतील हाडवैर सर्वश्रुतच आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधील आपल्या पक्ष नेत्यांना तशी सूचना द्यावी अशी मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती घेवून त्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे स्पष्ट केले.

त्यानंतर भाजपाचे आमदार ॲड.आशिष शेलार यांनी पुन्हा या विषयावर बोलण्यासाठी उभे राहीले आणि म्हणाले की, अध्यक्ष महोदय मला तुमच्याकडून संरक्षण हवेय. नाशिक मध्ये भाजपाच्या आमदारांनी एखाद्या विकासाची योजना मांडली तर ती योजना खासदाराच्या नावात समाविष्ट करण्यात येते. एखादा काम सुचविले की ते शिवसेना आमदाराच्या नावावर जमा होते. इतकेच नव्हे तर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या नावावर भाजपा आमदाराने सुचविलेले काम दाखविले जाते. हा कसला प्रकार आहे. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण करू नका ना, असा इशारा देत जी कामे आमदाराने सुचविली आहेत. ती कामे त्यांच्याच नावावर राहु द्या त्याचे श्रेय तुम्ही का हिसकावून घेता असा सवाल केला.

असाल तुम्ही युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून काय तुम्ही लोकांच्या कामाचे श्रेय शिवसेनेच्या नावावर करून घेणार का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

या गोष्टी अजिबात चालणार नाही असे गर्भित इशाराही शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

त्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे बोलायला उभे रहात म्हणाले, आपण लोकशाहीत राहतो. दुसऱ्या आमदाराने केलेल्या कामाचे श्रेय आपल्या नावावर घेणे चुकीचे. आपण एका नव्या प्रथेला जन्म देणार का? असा सवाल करत या गोष्टी आता झाल्या असतील तर ठिक पण या गोष्टींची प्रथा पडायला नको. अन्यथा त्याचे दुष्यपरिणाम मोठे असतील असा इशाराही दिला.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी सजेशन फॉर ॲक्शन असे उत्तर देत या विषयी अधिकचे बोलणे टाळले.

मात्र या निमित्ताने नाशिकमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या कामाचे श्रेय शिवसेनेकडून घेण्यात येत असल्याचा मुद्दा पहिल्यांदाच सभागृहात उघडकीस आला.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *