Breaking News

राम प्रधानांच्या निधनाने शरद पवारांना झाले दु:ख, आठवणी जागवित वाहीली श्रध्दांजली सकाळी ९२ व्या वर्षी प्रधानांचे निधन

मुंबई: प्रतिनिधी

राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

विलक्षण बुद्धिमत्ता, कार्यतत्परता आणि सचोटी या गुणांमुळे राम प्रधान प्रशासकीय क्षेत्रात अग्रभागी होते. विवादास्पद परिस्थितीत तोडगा काढण्यात, सामंजस्य घडवून आणण्यात प्रधान यांचा हातखंडा होता. ऑपरेशन ब्ल्यु स्टार पश्चात पंजाब समस्या अतिशय संयमाने, संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्वक हाताळण्याचे मोठेच कार्य राम प्रधान यांनी केले. अकाली दलाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी माझे योगदान घ्यावे म्हणून राम प्रधान यांनीच राजीव गांधींना गळ घातली होती. त्यावेळी मी राज्यात विरोधी बाकावर होतो. परंतु राजीव गांधींनी प्रधानांचा हा सल्ला मानला. प्रधानांची मुत्सद्देगिरी आणि राजीवजींची परिपक्वता याचा परिपाक असा की, पंजाब शांतता कराराची बोलणी करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. कालांतराने सर्वांच्या प्रयत्नाने पंजाब शांतता करार झाला. याचे श्रेय निश्चित राम प्रधानांना जाते ही आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच नेहरू सेंटर या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि रचनात्मक विधायक कार्यक्रमांना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *