मराठी ई-बातम्या टीम
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
मणिपूर मध्ये काँग्रेससोबत आघाडी करून तेथे पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसह इतर छोट्या-मोठ्या पक्षासह आघाडी करून राष्ट्रवादी निवडणूक मैदानात उतरली आहे. मात्र गोव्यात जागा वाटपाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय झालेला नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकट्याने निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण असून तेथे भाजपाचा पराभव होईल असेही त्यांनी सांगितले.