Breaking News

पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर, स्वकर्तृत्वशिवाय जनता मतदान करत नाही… सुप्रिया सुळे या स्वर्तृत्वावर निवडूण येतात, कामाचे कौतुक संसदरत्न पुरस्कारने

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह देशातील सर्व विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेली टीका अशोभणीय असून प्रत्येक वेळी मुला-मुलींना बाप जाद्यांची पुण्याई कामाला येत नाही असे सांगत सुप्रिया सुळे या स्वर्तृत्वावर निवडूण येत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना अनेकवेळा पुरस्कारही जाहिर झाल्याचे सांगत मोदी यांचा यांच्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

शरद पवार यांनी गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी वरील प्रत्युत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, सगळ्या राज्यांचं चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये सांभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत. अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केलं. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटलं. खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तुत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसरी, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही, असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार पुढे म्हणाले, संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी ९८-९९ टक्के हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे, उच्च दर्जाचा आहे. संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठवेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वतःचं कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतो.

म्हणूनच मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य हीदेखील संस्था आहे हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *