हिंदी चित्रपटाबरोबर अनेक मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. अनेक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ सारख्या सिनेमांनी कोटींची कमाई करत मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आणले आहेत. तर आजही काही सिनेमांना स्क्रिन्स मिळत नसल्यानं अनेकदा यावरून वादंग निर्माण झाला आहे.
दरम्यान मराठी सिनेमांना स्क्रिन्स न मिळणं हा एक वेगळा प्रश्न वर्षभरात रिलीज होणाऱ्या सिनेमांसमोर निर्माण होताना दिसतोय. सिनेमा आणि त्यांना न मिळणाऱ्या थिएटर्सविषयी प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी वक्तव्य करत काही सवालही उपस्थित केले आहेत. माध्यमांशी बोलताना मांजरेकर यांनी या विषयी भाष्य केले आहे.
नुकताच जागतिक रंगभूमीदिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर याविषयी बोलले. “सिनेमा हा मराठी माणसानं मोठा केला पण आज आपणच मागे पडत आहोत कारण आपल्यात आत्मविश्वास नाही. दीड कोटीत होणारा सिनेमा नेहमीच शंभर कोटी कमावेल असं नाही कारण आता लोक अनेक भाषेतील सिनेमा पाहातात ज्यात दर्जेदार आशय असतो. मराठी सिनेसृष्टी तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ आहे तसंत त्यात प्रज्ञावंत दिग्दर्शकांची वानवा नाही. पण तुम्हाला जर साऊथ सिनेमा डब केलेला चालतो मग मराठी काही नाही?” असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “आपण आपला विचार बदलायला हवा. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाही ही आरडा-ओरड खोटी आहे. थिएटर्सच्या मालकांना भाषेशी नाही तर सिनेमा चालण्याशी घेणं-देणं आहे”. यावेळी मांजरेकरांनी बाईपण भारी देवा या सिनेमाचं इथे उदाहरण दिलं. ते म्हणाले, “आता बाईपण भारी देवा सिनेमाला थिएटर मिळालं की, आताचा प्रेक्षक हा सगज झाला आहे. त्यांना प्रत्येकवेळी कोणते मोठे स्टार्स नकोत तर चांगल्या आशयाचा सिनेमा हवाय असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.