Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी

राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली असल्याची टीका करत खिळखिळी झालेली आरोग्यव्यवस्था राज्य सरकारने सुधारावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्यात नागपूर, नांदेड, संभाजीनगर, कळवा येथे औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले तरी सरकार गाफील आहे. औषधं खरेदीच्या नावाने बोंब आहे. सरकार जनतेचे आरोग्य राखण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. हे सरकार रुग्णांना ५ रुपयांची गोळी उपलब्ध करून देऊ शकत नाही, यामुळे रुग्णांचा जीव वाचवू शकत नाही याची खंत वाटते. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅस वर असून याला सर्वस्वी सरकार, आरोग्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारची या अधिवेशनात स्टेथस्कोप घेऊन तपासणी करणार अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, अशोक चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी “आरोग्य सेवा पडली आजारी कोणत्या तोंडाने बोलता शासन आपल्या दारी” “शासकीय रुग्णालयात नाही डॉक्टर आणि नर्सेस म्हणून वाढत आहे मृत्युच्या केसेस” “राज्याची आरोग्य व्यवस्था खिळखिळी रोज जातोय गरीब निष्पाप तरुणांचा बळी” “चंद्रपूर ४३६ मृत्यू सहा महिन्यात नांदेड २४ मृत्यू, ठाणे -कळवा २४ मृत्यू ,छत्रपती संभाजी नगर१० मृत्यू” अशा विविध घोषणा लिहिलेले काळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *