Breaking News

त्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, शरद पवारांनी डबल गेम खेळला.. आधी चर्चा केली आणि नंतर भूमिका बदलली

राज्यात २०२४ च्या निवडणूकांना आता एक वर्षाचा कालावधी राहिलेला असतानाच भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणूकीत औट घटकेच्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पहाटेचा शपथविधी घेत स्थानापन्न झाले. मात्र या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांची समंती होती. आणि त्यांच्या संमतीनुसारच हे सरकार स्थापन झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र कालांतराने त्यांनी भूमिका बदलल्याने सरकार औटघटकेचे ठरले. तसेच शरद पवार यांनी आमच्याशी डबल गेम खेळले असा आरोपही केला.

भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना वरील माहिती दिली.

पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्ट्री’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, राष्ट्रवादी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असा खुलासाही केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती.

मग शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं.
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले, अशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीसांनी दिली.

एकनाथ शिंदे आणि तुमच्यात मतभेद आहेत का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. ती जाहिरात चुकीची छापली गेली, असं ते म्हणाले. आमच्या लोकांनी चूक केली केली, असंही त्यांनी मान्य केलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात.

कारण मी कधीही त्यांचा (एकनाथ शिंदे) मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही आणि तेही मी उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्ही दोघांनी एक मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात, ते चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीही होऊ शकत नाही. आम्ही एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *