Breaking News

जमिन विक्री घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन हाजीर हो १९ डिसेंबर ला जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश

जळगांव : प्रतिनिधी

घरकूल योजना राबविताना आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगलेल्या सुरेश जैन यांच्या अडचणीत आता नव्याने भर पडली आहे. शहरातीलच रेल्वेलगतच्या जमिनीच्या नकाशात फेरफार करून सदर जमिन विकल्याप्रकरणी खान्देश बिल्डरच्या संचालकांसह माजी आमदार सुरेश जैन यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

शहरातील दूध फेडरेशन आणि रेल्वे स्टेशनच्या लगत सर्व्हे नं.  ३११-१ अ ही ३० हजार चौ.फुट क्षेत्रफळाचा भूखंड खान्देश बिल्डर्सने चंद्रशेखर मंत्री यांच्या पत्नींना विकली. मात्र प्रत्यक्षात हा भूखंड २४ हजार ४०० चौरस फुटाचा भूखंड होता. तसेच या भूखंडातील जवळपास ५ हजार ६०० चौरस फुट जागा रस्ते (डीपी रोड) बांधणीकरीता जळगांव महापालिकेने आरक्षित केली होती. परंतु खान्देश बिल्डर्सने शासकिय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून सदर जागा सौ. मंत्री यांना विकल्याचे चंद्रशेखर मंत्री यांनी सांगितले.

याबाबत खान्देश बिल्डर्सच्या संचालकांकडे सातत्याने विचारणा केली असता माजी आमदार आणि खान्देश बिल्डर्सचे माजी संचालक सुरेश जैन हे आरक्षित जमिन तुम्हाला मिळवून देतील असे सातत्याने सांगत होते. परंतु पाच वर्षे झाले तरी त्यावर खान्देश बिल्डर्सकडून कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अखेर खान्देश बिल्डर्सच्या विरोधात जिल्हा न्यायालयाने गुन्हा नोंदवित त्यांच्या संचालकांच्या अटकेचे आदेश काढले. परंतु या संचालकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेत जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्हा न्यायालयाने खान्देश बिल्डर्सचे माजी संचालक सुरेश जैन यांच्यासह कागदपत्रांमध्ये फेरफार केलेल्या शासकिय अधिकाऱ्यांना १९ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर जळगांव जिल्ह्यामध्ये भाजप नेते आणि मंत्री गिरिष महाजन यांना शह देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी सुरेश जैन यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपकडून त्यांना पक्षात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर आता सुरेश जैन यांना पुन्हा न्यायालयाने जमिन विक्रीतील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने जैन यांच्यासमोर पुन्हा अडचणींचा डोंगर उभा राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *