Breaking News

वेश्यांची सहेली… आत्मभानातून जगण्याची नवी ऊर्जा देणारी संस्था

उद्धरेत् आत्मना आत्मानम् हे गीतेचे वचन.
त्यांनी ते वचन प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. त्यांच्या जगण्याचे ते सूत्र बनले आहे. वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यातील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभी करणारी संस्था म्हणजेच सहेली!
वेश्या व्यवसायातील दहा बारा महिलांनी एकत्र येऊन सहेलीची स्थापना केली. कोणतीही वेश्या या व्यवसायात खुशीने येत नाही. काहींची फसवणूक होते. काही गरिबी, निरक्षरता यामुळे आमिषाला बळी पडून वेश्या व्यवसायात येतात. तिथे आल्यावर आपले कोणीच नाही, यातून सुटकेचा मार्ग नाहीएक ही नैराश्याची भावना येते. आणि हाच व्यवसाय त्यांच्या उपजिविकेचे साधन बनते. मात्र, सहेलीची स्थापना झाली आणि त्यांच्या भावनांना खो देऊन मै हूँ ना म्हणत प्रेमाचा आधार दिला.
झिगझणी शिवम या सहेलीच्या अध्यक्षा. नऊ जणींचे कार्यकारी मंडळ आठशे सदस्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेते. ज्या फसवणुकीतून इकडे आल्या, ज्यांना हा व्यवसाय करायचा नाही, ज्यांची शारीरिक क्षमता राहिलेली नाही अशा महिला सहेलीत येतात. त्यांच्या हाताला काम दिले जाते आणि कामाचा मोबदलाही. पोलिस, सामाजिक संस्था या व्यवसायातून स्त्रियांची सुटका करतात. पण, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहतो. घर, पालक, समाज पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे त्यांना सामावून घेत नाही. यावर उपाय म्हणून सहेली कम्युनिटी किचन चालवले जाते. त्या महिला येथे स्वयंपाक करतात. जेवण कमी दरात मिळते म्हणून परिसरातील दुकानदार, फिरते विक्रेते, रेडलाइट एरियातील महिला येथून जेवण घेऊन जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल, भाजीपाला हे सर्व त्याच खरेदी करतात. किचनला प्रतिसाद चांगला आहे. मोबदलाही चांगला मिळतो. त्याखेरीज त्या महिलांना सहेलीच्या माध्यमातून मंगल कार्यालये, हॉटेले, वसतिगृह, दवाखाने अशा ठिकाणी काम मिळते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मग सात आठ जणी मिळून खोली घेऊन राहतात. स्वत:चा खर्च स्वत: भागवतात.
सहेलीमार्फत चोवीस तासांचे पाळणाघरही चालवले जाते. त्यात काम करणाऱ्या महिलांची मुले व रेडलाइट एरियातील महिलांची मुले राहतात. काही महिला मुलांची देखभाल करतात. मुलांना दूध, औषधे, जेवण अशा सुविधा पुरवल्या जातात. बालवाडीत मुलांना गाणी, गोष्टी, खेळ, अक्षर ओळख शिकवले जाते. पहिलीपासून मुलांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाठविण्यात येते. ही सर्व मुले होस्टेलवर असतात. त्यात काही पदवीधारकही आहेत. ती संस्थेला मदत करतात. त्या सर्वांचा खर्च संस्थेला मिळालेल्या देणगीतून होतो.
कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे व साधनांच्या उपलब्धतेमुळे महिलांत बर्थरेटचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या पाळणाघरात फक्त वीस मुले आहेत. पण, त्यातील बरीच मुले लैंगिक छळाला बळी पडलेली आहेत. २००७ साली सहेलीने एक मोठे पाऊल उचलले. ते म्हणजे सहेली परिवार बँक… महिलांना बचतीची सवय लागावी हा सुहेतू. संस्थेच्या सभासद महिला बचत करतातच पण रेडलाइट एरियात घरोघरी जाऊन पैसे गोळा केले जातात. त्यांच्यासमोरच पासबुकावर रकमांची नोंद केली जाते. नंतर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. यामुळे त्यांना कर्ज घेता येते. छोट्या स्वरुपातील व्यवसाय सुरु करण्यासाठी बँक मदत करते. शिवणकाम, पिशव्या बनवणे, स्टेज सजावट, दागिने बनवणे, फुलांच्या माळा बनवणे, स्वेटर तयार करणे असे प्रशिक्षणही सहेलीद्वारे त्यांच्यातील कौशल्य ओळखून दिले जाते. इतकेच नव्हे तर लोकांशी कसे बोलावे, डॉक्टरांना माहिती कशी द्यावी याचेही शिक्षण महिलांना दिले जाते.
पथनाट्यासारख्या प्रयत्नांतून स्त्रीयांचे प्रबोधन सहेली करते. संस्थेच्या अनेक सभासद स्त्रियांपैकी काहीजणींवर जबरदस्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक समस्या आहेत. काही एचआयव्हीग्रस्त आहेत तर काहीजणी अ‍ॅनिमिया, गुप्तरोग, क्षयरोगाने त्रस्त आहेत. शिवाय व्यसनाधीनता आहेच. वरील रोगांची लक्षणे, त्यासाठी घ्यायची काळजी हे फिल्मद्वारे, चित्रांद्वारे महिलांना समजावण्यात येते. त्यामुळे महिला नियमित दवाखान्यात जातात. तपासणी करून घेतात. मोबाइल क्लिनिक व्हॅनमुळे काम आणखी सोपे झाले आहे. टी.व्ही.वरील जाहिरातींमुळे त्यांच्यात जागृती होते. त्यामुळे रोग होऊच नये यासाठी स्त्रिया काळजी घेतात. ससून हॉस्पिटल, नारी संस्था यांचीही या कामात मदत असते. रेडलाइट एरियातील स्त्रियांसाठी महिलांनीच शैक्षणिक साधने तयार केली आहेत. त्याद्वारे जागृतीचे काम होते.
सहेलीचे कार्यालयीन कामकाज तेजस्विनी सेवेकरी आणि त्यांच्या सहकारी पाहतात. ‘सहेलीकङ्कची प्रेरणा त्या स्वत:च आहेत. ज्यांना हा व्यवसाय करायचा नाही. त्यातून सुटका हवी आहे असा महिलांनी एकत्र येऊन १९९८ साली संस्थेचा उपाय शोधला. म्हणून संस्थेचे नाव सहेली.. मैत्रीण तुमची! या व्यवसायातील बऱ्याच जणी निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करण्याचे काम आम्ही जोमाने करतो, असे त्या सांगतात. संस्थेला रेशन दुकानाचा परवाना मिळाला आहे. जागा निश्चित झाली आहे. पण, महानगरपालिकेकडून दिरंगाई होत आहे. त्याशिवाय मार्केट रेस्टॉरंट, को-ऑपरेटिव्ह स्टोअर काढण्यासाठीही प्रयत्न चालू आहेत. मेडिटेशन, प्राणायाम, विपश्यना हे ही स्त्रियांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर पडण्यास मदत करून, स्वावलंबी बनवू शकते. त्यासाठी प्रयत्न चालू असतात. हळुहळू हे सगळे आकार घेत आहे अनेकींना सर्वसामान्य स्त्रीसारखे जीवन जगायचे आहे. भूतकाळ विसरून नव्या उमेदीने काम करायचे आहे. पण त्यांच्या वाट्याला अपमान व उपेक्षाच येते. शासनाकडून, समाजाकडून मदत मिळत नाही. उलट त्रास होतो, अवहेलनाच पदरी येते. काहीही चूक नसताना हे सारं सहन करायचं. म्हणूनच एकमेकींला आधार देत, कथा, व्यथा जाणून घेत जगायचं. एकमेकींची सहेली होऊन…

शब्दांकन- महेश पवार
सहेली,
एचआयव्ही/एडस् कार्यकर्ता संघ,
१०८९, शिवाजी रोड,
श्रीनिवास टॉकिजसमोर, बुधवार पेठ,
पुणे – ४११००२
मोबाइल – ९८८१४०४८११

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *