Breaking News

छगन भुजबळ यांची मागणी, सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेखन लिहिणाऱ्यांवर कारवाई करा छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा तीव्र निषेध केला.

छगन भुजबळ म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड, धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचे पत्रात म्हटले आहे.

एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *