Breaking News

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचे निधनः काँग्रेससह या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली दिल्लीतील मेदांता रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मृत्यूसमयी बाळू धानोरकर यांचे वय ४७ वय होते. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.
बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ४७ होते. खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात आले. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी नवी कार खरेदी केली होती. भद्रावती येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पोटाला व कंबरेच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मात्र या दुखापतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पोटदुखी वाढल्यानंतर नागपुरात अरिहंत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. या अपघातात स्वादुपिंडाला जबर दुखापत झाली. तीच पुढे गंभीर होत गेली.
खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंतिम संस्काराला जाऊ शकले नाहीत. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

निधनाचे वृत्त कळताच या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली

खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने समर्पित नेता आणि बंधुतुल्य सहकारी गमावला

काँग्रेस पक्षाचे तडफदार लढवय्ये नेते, चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे. हॉस्पिटलमधील उपचारानंतर ते पुन्हा बरे होऊन येतील असे वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली. बाळू धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारा एक समर्पित नेता व आपण बंधुतुल्य सहकारी गमावला, अशा शोकभावनामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळू धानोरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता अशी धानोरकर यांची ओळख होती. जनतेच्या प्रश्नावर जागरूक राहून ते सोडविण्यासाठी ते कटिबद्ध होते, त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायला ही ते तयार असायचे. ४८ वर्षांच्या अल्पवयातच त्यांनी सामाजिक कार्यकर्ता ते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा खासदार असा वाखाणण्यासारखा प्रवास केला. कुठलाही राजकीय वारसा नसताना प्रचंड मेहनत आणि जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर एक कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.
खा. बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठिण प्रसंगी संपूर्ण काँग्रेस पक्ष धानोरकर कुटुंबियांच्या सोबत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले

‘तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शोकपूर्ण भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, पूर्वीचा एक सच्चा शिवसैनिक ते आमदार आणि खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची वाटचाल जवळून पाहिली आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. नुकतेच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यानंतर त्यांचे असे अकाली निधन त्यांच्या कुटुंबियांसह, कार्यकत्यांकरिता एक आघात आहे. धानोरकर कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपलेः बाळासाहेब थोरात

खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

खा. धानोरकर यांच्या जाण्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने झटणारा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेलेला आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या धानोरकर यांनी लोकसेवा करत राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि एक एक पायरी चढत आमदार आणि खासदार झाले. सदैव उपलब्ध असणारे आणि लोकांच्या मदतीला धावून जात असल्याने अल्पावधीतच ते चंद्रपूर जिल्ह्यात लोकप्रिय झाले. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे विषय ते अत्यंत पोटतिडकीने मांडत असतं. प्रसंगी गोडीने, कधी आक्रमक होऊन प्रश्न सोडवून घेणारे अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. खासदार म्हणून पुन्हा निवडून येण्याची त्यांची क्षमता होती. विधानसभा निवडणुकीमध्येही काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचे काम व जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याकरता विदर्भामध्ये त्यांची आम्हाला मदत होणार होती. पण त्यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवारांसोबत सर्व जिल्हे फिरलो याचा अभिमान

अजित पवारांवर टिका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *