मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोखल्या गेलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीही लवकरच होणार होती. मात्र राजस्थानात राजकिय पेच निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड रखडल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
साधारणत: पाच वर्षापूर्वी सत्तेतून पायाउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक चेहऱ्याचा व्यक्ती असावी अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. परंतु तसा चेहरा त्यावेळी नसल्याने माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तरीही पक्षाला राज्यात फारशी झेप घेता आली नाही. त्यामुळे अखेर त्यांच्या जागी विखे-पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांच्या राजकिय मर्यादांमुळे पक्षाला म्हणावे तसे यश पदरात पाडून घेता आले नाही. त्यातच आता थोरात हे राज्याच्या मंत्रिमंडळातही आहेत. त्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे धोरण पक्षश्रेष्ठींनी स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांच्या यंग टीममधील राजीव सातव यांच्याबरोबर भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले आणि सध्या विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे अंतिम यादीत चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण हे सोनिया गांधी यांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना राज्यातील काँग्रेस नेते आणि आमदारांचा फारसा पाठिंबा नाही. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी द्यावी अशी अनेक वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. याशिवाय राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना परभणी मतदारसंघ सोडला तर राज्यातील इतर कार्यकर्त्ये, नेत्यांशी संपर्क फार नसल्याची तक्रार काँग्रेसमधूनच केली जात आहे. यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा आक्रमक स्वभाव आणि राजकिय गोळा-बेरजेचे राजकारण जमत असल्याने त्यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते स्वत:ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील राजकिय पेच संपुष्टात आल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून लगेच निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाच्या केंद्रीय पक्षाध्यक्षाबाबतही लवकरच निर्णय होवून नव्या पक्षाध्यक्षाच्या निवडीपाठोपाठ प्रदेशाध्यक्षाची निवड जाहीर होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
