Breaking News

शिक्षणमंत्री विनोद तावडेजी, फक्त संवेदनशीलतेची अपेक्षा

सरप्लस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत आमदार कपिल पाटील यांचे तावडेंना खुले पत्र  

प्रति,

मा. ना. श्री. विनोद तावडे

शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,

अत्यंत व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहतो आहे. शिक्षकांच्या छळाचा दुसरा अध्याय सुरु झाला असतानाच अमरावतीच्या विद्यार्थ्याला थेट अटक करण्याचे आदेश आपण दिल्याचे लोकमतच्या पहिल्या पानावर वाचले. त्या मुलाचा काय गुन्हा होता?

गरीबा घरचा पोरगा. त्याने प्रश्न विचारला होता,

‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करुन देईल काय?’

त्यावर आपण उत्तर दिलंत,

‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर.’

आपले उत्तर धक्कादायक आहे. त्याचं मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या अन्य विद्यार्थ्याला अटक करण्याचे आपण आदेश दिलेत. पोलिसांनी त्या मुलांना पकडलं. मोबाईल जप्त केला. व्हीडीओ डिलीट केला.

ही सारी बातमी खरी असेल तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आपणाकडून तरी असं व्हायला नको होतं. आपण विद्यार्थी चळवळीतून आला आहात. त्यामुळे या मुलांना समजून घ्यायला हवं होतं. पोलिसांनी स्वतःहून काही अतिरेक केला असेल, तर आपण तो थांबवायला हवा होता.

इथे मुंबईतल्या शिक्षकांचा छळ सुरू झाला आहे. सहाशेहून अधिक शिक्षक सरप्लस झाले आहेत. मुलं कमी झाली या कारणासाठी हे शिक्षक सरप्लस झालेले नाहीत. संचमान्यतेचे बदललेले निकष आणि सरप्लस करण्याची सरधोपट पद्धत यामुळे एवढी मोठी संख्या वाढली आहे. त्यात ८०टक्के महिला आहेत. त्यांना आता रायगड जिल्ह्यात पोलादपूरला, पालीला जायला सांगणार आहात का? पालघर जिल्ह्यात मोखाडा, विक्रमगडला पाठवणार आहात का?

यातील बऱ्याच शिक्षिका सीनिअर आहेत. वर्ष दोन वर्षात रिटायर होणार आहेत. कुणी एकट्या कमावत्या आहेत. काहींची मुलं लहान आहेत. काही प्रेग्नंट आहेत. आपलं घरदार सोडून एकटी बाई जंगलातली वाट कशी तुडवणार? शिक्षक प्रचंड तणावात आहेत. अनेकांचा बीपी वाढला आहे. झोप नाही. घरच्यांचीच झोप उडाली आहे. त्रास फक्त अतिरिक्त शिक्षकांनाच नाही, शाळेत राहिलेल्या शिक्षकांचाही वर्कलोड वाढणार आहे. विद्यार्थ्यांना महत्वाच्या विषयांचे शिक्षक मिळणार नाहीत.

काल भांडूपच्या डीएव्ही कॉलेजमध्ये समायोजन सुरु असताना या शिक्षकांचा क्षोभ बाहेर आला. मी स्वतः तिथे गेलो होतो. मा. शिक्षण आयुक्तांनी नकार नोंदवून घेण्याचे मान्य केले. मार्ग निघेपर्यंत पगार बंद होणार नाहीत, असं आश्वासनही दिले. ज्यांना पालघर, रायगडमध्ये जायची इच्छा आहे, अशा शिक्षकांचं समायोजन जरूर त्या त्या भागात करा. परंतु सक्ती करू नका, अशी आपणाला विनंती आहे.

मार्ग कसा काढता येईल, याबद्दल मी एक सविस्तर टीपणी मा. शिक्षण आयुक्तांकडे यापूर्वी पाठवली आहे. तुकडीला किमान दीड शिक्षक हा जुना फॉर्म्यूला कायम ठेवला तरी कुणी सरप्लस होणार नाही.  प्रत्येक विषयाला शिक्षक मिळालाच पाहिजे. कला, क्रीडा शिक्षक हे स्पेशल टीचर आहेत. विषय शिक्षकांचा संच वेगळा आहे. हे सूत्र पाळलं तरी प्रश्न सुटेल. अर्थात हा मर्यादीत काळाचा उपाय आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आपण एखादा अभ्यासगट नेमावा. कारण राज्यभर ही परिस्थिती थोड्याफार फरकाने आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना अकारण सरप्लस झालेल्या शिक्षकांना बाहेर काढणं आणि वर्ग ओस पाडणं यात मुलांचं नुकसान होईल. शिक्षकांना मनस्ताप होईल. त्यामुळे तूर्त सरप्लस समायोजन थांबवावं. शिक्षकांना त्यांच्याच मूळ शाळेत शिकवू द्यावं. कुणाचेही पगार बंद करु नयेत. एवढीच आग्रहाची विनंती.

हा प्रश्न गंभीर आहे. तो आपण संवेदनशीलतेने हाताळावा, ही विनंती.        

यासाठी जे सहकार्य आवश्यक राहील ते मी द्यायला तयार आहे.

धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *