Breaking News

सतेज पाटील यांचा इशारा, अलमट्टीतील पाणी सोडायला लावा अन्यथा, कोल्हापूर-सांगली… पूर उपाययोजनाबाबत दोन्ही राज्यांमध्ये तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी

धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.

कोल्हापूर – सांगली परिसरातील संभाव्य पूरस्थितीबाबत २८९ सूचना क्रमांक २ नुसार आमदार सतेज पाटील यानी सरकारचे लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. परिणामी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी दोन्ही राज्यांची मंत्री समितीची बैठक घेण्यात येत होती. महापुरावर २०२१ व २०२२ मध्येही दोन्ही राज्यातील मंत्री स्तरावरील बैठका झाल्या होत्या. मात्र यावर्षी ही बैठक झालेली नसून ती तातडीने घेण्यात यावी. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणातील विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना कराव्यात. अलमट्टीतील पाण्याची उंची ५१६.७४ पर्यंत गेली असुन ती १५ ऑगस्ट पर्यत ५१७ वर स्थिर ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, आमदार पाटील यांची पूरग्रस्त जनतेच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न मांडला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
याबाबत करावयाच्या उपाय योजनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करतील असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना पत्र पाठवणार-आमदार सतेज पाटील

मुंबई – कोल्हापूर आणि सांगली पुरासंदर्भात अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा खूप महत्वाचा आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी गेली २ वर्षे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिला आहे. तसाच समन्वय यावर्षीही सुरु आहे. या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना पत्र पाठवणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सांगली आणि कोल्हापूरात येणाऱ्या महापुरामध्ये अलमट्टी धरणाचे एक विशेष महत्व आहे. दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन होवून याबाबत समन्वय ठेवला जातो, तसेच यावेळीही राजकीय चर्चा होणे महत्वाचे आहे. ‘अलमट्टी’ च्या पाण्याचे योग्य नियोजन झाले तर महापुराचा परिणाम कमी होईल, अन्यथा २०१९ आणि २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होईल. यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *