Breaking News

संसदेत विरोधक पंतप्रधानांची वाट बघतायत, तर पंतप्रधान मुख्यमंत्री गेहलोतांच्या… पीएमओने भाषण हटविल्याने अशोक गेहलोत ऑनलाईन पध्दतीने उपस्थित

एकाबाजूला अडीच महिन्याहून अधिक काळ मणिपूर राज्यातील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच दिवसेंदिवस तेथील नवनवीन घटनांचे धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरप्रश्नी आपले मत मांडावे यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जायलाही तयार नाहीत. तर दुसऱ्याबाजूला मागील दोन महिन्यात जवळपास ७ व्यांदा पंतप्रधान मोदी हे राजस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र कार्यक्रमाच्या पत्रिकेतून भाषण हटविण्यात आल्याचा आरोप करत आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. त्यास लगेच पंतप्रधान कार्यालयाने उत्तर देत मुख्यमंत्री कार्यालयानेच उपस्थित राहणार नसल्याचे कळविल्याचे सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात येत असल्याचे दिसून आले.

वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानातील सिकर येथून देशातील शेतकऱ्यांना द्यावयाच्या मानधनाचा हप्ता त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध विकास कामांच्या शुमारंभही पंतप्रधान मोदी हे येथूनच करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला या कार्यक्रमाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ३ मिनिटाचे भाषण ठेवण्यात आले होते. मात्र ऐनवेळी गेहलोत यांचे भाषण हटविण्यात आले. त्यामुळे अशोक गेहलोत यांनी थेट पीएमओ या ट्विटर हँडलला टॅग करत आपल्या कार्यालयाने माझे भाषण हटविल्याचे ऐनवेळी कळविण्यात आले. तसेच माझ्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे मला पंतप्रधान मोदींच्या स्वागताला प्रत्यक्ष हजर राहता येत नाही. तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून हजर राहणार आहे असून ऑनलाईन माध्यमातूनच पंतप्रधानांचे स्वागत करत आहे आणि कार्यक्रमास उपस्थित असेन असे सांगितले. त्याचबरोबर अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाच मागण्याही केल्या.

त्यावर पीएमओकडूनही अशोक गेहलोत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच पायाला दुखापत झाल्याने हजर राहु शकणार नाहीत असे कळविण्यात आल्याने आपले भाषण हटविण्यात आल्याचा खुलासा पीएमओ ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आला.

दरम्यान, अशोक गेहलोत यांच्या या ट्वीटवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. खुद्द मुख्यमंत्र्यांचंच भाषण कार्यक्रमातून हटवण्यात आल्यामुळे काँग्रेसकडून यावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहू शकत नसल्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून आपला संदेश देता यावा, अशी मागणी गेहलोत यांनी केली असून ती प्रोटोकॉलमध्ये बसणारी नाही, अशी भूमिका पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटनंतर अशोक गेहलोत यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाचा दावा खोडून काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या कार्यालयानं माझ्या ट्वीटची दखल घेतली. मात्र, कदाचित त्यांनाही वास्तवाची माहिती देण्यात आलेली नसावी. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पाठवलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझ्या भाषणाचा उल्लेख होता. पण काल रात्री मला पुन्हा सांगण्यात आलं की माझं भाषण होणार नाही, असं गेहलोत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

माझ्या कार्यालयानं भारत सरकारला सांगितलं होतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्या पायाला दुखापत लागल्यामुळे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होईन. माझे मंत्री कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील. अजूनही मी राजस्थानच्या हितासाठी कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नॉन इंटरॅक्टिव्ह मोडवर सहभागी असेन, असंही अशोक गेहलोत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *