Breaking News

महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपाकडून उद्या “माफी मांगो”चे प्रत्युत्तर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा

उद्धवजींच्या सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा उद्धवजींना माझा प्रश्न आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे, हिंदू मनाला इजा पोहोचली जाईल, अशी वक्तव्ये समाजमाध्यमांवर आल्यानंतर उद्धवजी मौन सोडायला तयार नाहीत, मग कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात का?

आज समाजात असंतोष पसरला आहे. प्रभू श्रीरामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण, संत, वारकरी संप्रदाय या सर्वांवर केलेली चेष्टा, भंकस ही उद्धवजींच्या शिवसेनेला सहन कशी होते? महाराष्ट्र हे सहन करु शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीच्या विरोधात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

महापुरुषांचा अपमान महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेकडून सुरु आहे.

हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्यांच्याविरोधात भाजपातर्फे १७ डिसेंबर रोजी सहा लोकसभा क्षेत्रात “माफी मांगो” निदर्शन करण्यात येणार आहेत. उद्धवजी माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा… याबाबत भाजपा निदर्शने करणार आहे. यापुढे देखील आम्ही हा विषय सोडणार नसल्याचे त्यांनी जाहिर केले.

उद्धवजींच्या शिवसेनेनेकडून अफगाणी संकट

उद्धवजींच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना भाजपा विधीमंडळाचे उपनेते आमदार भाई गिरकर यांनी दोन पुस्तके कुरियर केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने छापलेली अशी दोन पुस्तके आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न उद्धवजींच्या शिवसेनेकडून जाणीवपुर्वक सुरु आहेत. भारतातील संबंध आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यावेळी शेतकऱ्यावर संकट ओढवते तेव्हा त्याला अस्मानी किंवा सुलतानी संकट म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण करुन उद्धवजींच्या शिवसेनेने अफगाणी संकट निर्माण केले असल्याची टीका केली.

उद्धवजींची सेना हे का करत आहे, असे प्रश्न पडले आहेत. आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. आम्ही मागेही पाहिले होते. डॉक्टर चांगली औषधे देतो की कम्पांऊडर चांगली देतो, या वादात आम्हाला पडायचे नाही. WHO चे सल्लागार कोण असू शकतात याबाबतही त्यांनी अज्ञान पाजळले आहे. या दोन प्रसंगानंतर यांची मस्ती आणि मिजाज परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरुन खोटी माहिती पसरविण्यापर्यंत गेलीये. ही खोटी माहिती पसरविणे अक्षम्य चूक आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय? असा सवालही त्यांनी संजय राऊत यांना केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत उद्धवजींच्या सेनेचं इतकं अज्ञान? समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर आधारीत असलेल्या संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला, हे तरी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मान्य आहे का? गरिब, दलित, शोषित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला, हे तरी त्यांना मान्य आहे का? स्वातंत्र्यापासून नवीन भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले, हे तरी त्यांना मान्य आहे का? नाहीतर या सर्व गोष्टी उद्धवजींमुळेच झाल्यात, असंही संजय राऊत सामनात छापायला मागे पुढे पाहणार नाहीत अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

राऊत यांनी चुकीची माहिती दिल्यानंतरही माफी किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाही. हा अहंकाराचा परमोच्च बिंदू आहे. भारतीय जनता पक्षाला हे मान्य नाही. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला, त्या काँग्रेससोबत जाऊन उद्धवजींच्या सेनेने आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून भाजपा याचा निषेध करत आहे. आम्ही उद्धवजींना याबद्दल त्यांची भूमिका विचारत आहोत अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *