Breaking News

अजित पवारांनी सभागृहातच दिला भाजपा आमदारांना इशारा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार भरतशेठ गोगावले कधी घालणार कोट पॅट

विधानसभेत आज २९३ वरील प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा नेत्यांच्या अनेक वक्तव्यावरून पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच इशारा दिला. तर शिंदे गटातील आमदारांच्या टोप्याही उठवित रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात सर्व आमदारांना आवाहन केले.

विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यंतरी काही जण बारामतीत आले होते. अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. ते अशाप्रकारच्या वल्गना करतात असे सांगत अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता टोला लगावला. तसेच आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अपघातावरुन आठवलं मधल्या काळात आपण विनायक मेटेंना गमावलं. परवा पण जयकुमार गोरेंनी इथं भाषण केलं आणि रातोरात काय झालं. बाबांनो रात्री १२ ते ३ प्रवास नका करु, असे आवाहन करत अजित पवार पुढे म्हणाले, त्यानंतर सभागृहामध्ये आपल्या मागील रांगेमध्ये बसलेल्या धनंजय मुंडेकडे हात करुन हा धनंजयही त्या दिवशी चालला होता. त्याला म्हटलं शहाणपणा करा, रात्री १२ ते ३ प्रवास करु नका. काय त्या दोन तीन तासांनी होणार आहे?. आपण कितीही बसलो तरी त्या चालकाला कधी डुलकी लागेल कळत पण नाही. मी म्हणतो की सर्वांना जीव महत्त्वाचा आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले, सुरक्षित रस्ते होत आहेत, महामार्ग चांगले होत आहेत. नियमांचं पालन केलं पाहिजे. काही बंधन स्वत:वर घालून घेतली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेषावरून बोलताना म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भात नव्याने साखर उद्योग सुरु करण्यावर भर देऊ नका. जर उद्या अवसायानात कारखाना काढला तर त्याला फारतर १४ कोटी रूपयांची किंमत मिळते. त्यापेक्षा कपाशीचे उत्पादन जास्त होते. त्या अनुषंगाने जास्तीत उद्योग निर्माण करा, सोयाबीन आणि इतर कडधान्याचे प्रमाण जास्त आहे. त्या अनुंषगाने काही गोष्टी निर्माण झाल्या तर तेथील शेतकऱ्यांना आणि नवतरूणांना रोजगार मिळू शकेल असा सल्लाही शिंदे-फडणवीस सरकारला दिला.
वास्तविक पाहता मराठवाडा आणि विदर्भाचा विकास मागे राहण्यामागे इतरांवर आरोप करणे चुकिचे आहे. इथल्या जिल्हा सहकारी बँका कशा बुडाल्या, कारखाने अनेक बंद पडले, त्यामागे काही दुसरी मंडळी होती का? इथलीच मंडळी होती ना असा खोचक टोलाही त्यांनी या भागातील लोकप्रतिनिधी राजकारण्यांना लगावला.

भरतशेठ गोगावलें, कधी घालणार कोट आणि पॅट ?
मागील महिन्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. काही आमदार आता आमचा नंबर लागेल म्हणून काहीजण तयारीत बसले आहेत. मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही केल्या होत नाही. पण भरतशेठ गोगावले यांचा शपथविधी जगाच्या पाठीवर कोठे का? असेना आपण त्यांच्या शपथविधीला जाणार असल्याचे सांगत भरत शेठ कधी घालणार कोट आणि पॅट. लग्नात घालायला मिळाला नाही किमान मंत्री पदाच्या शपथविधीला तर घालायला मिळेल अशी आशा आहे असे सांगत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची अजित पवार यांनी टोपी उडविली.

आता तुमची बाजू घेतली तरी अडचणच का?
अजित पवार यांनी भाजपाच्या काळात आलेल्या उद्योगांचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या भाजपाने मागील काळात काय काम केले याविषयीचे मुद्दे मांडत असताना भाजपाच्या काही सदस्यांनी खाली बसून अजित पवारांच्या वक्तव्यावर हरकत घेतली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, आता कमालच झाली. तुमची बाजू घेतोय तरी तुम्हाला अडचण आहे का? असा टोलाही लगावला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *