Breaking News

संजय राऊत म्हणाले, आजची टोमणे नाहीतर फटके सभा; अनेकांच्या पोटदुखीवर… ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही

महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती मराठी आणि महाराष्ट्राचा इतिहास? असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावत आजच्या सभेत विरोधकांच्या पोटदुखीवर रामबाण उपचार होणार असल्याचे भाकित केले.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच सभा घेत आहेत. त्यातच मागील महिनाभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात तीन सभा घेतल्या. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. यापार्श्वभूमीवर आज होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही ऐतिहासिक सभा होणार असून विरोधकांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगत

ही सभा ऐतिहासिक आहे. कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे अशा सभांच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. ते आता येत आहेत. ही सभा लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. ही सभा फक्त त्यासाठीच नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील अशी आमची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.

मनसे, भाजपाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हे सगळे लोक वैफल्यग्रस्त असतात. त्यांच्या पदरी महाराष्ट्रात राजकीय अपयश आलेलं आहे. त्यांना लोकांनी जी विरोधकांची भूमिका दिली आहे, ती ते व्यवस्थित पार पाडत नाहीत. अशा वेळी सत्ताधाऱ्यांवर बेछूट आरोप करायचे, शिवसेनेवर चिखलफेक करायची, भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं. दुसऱ्या कुणाच्या कांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायचे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेवर खुलासा करण्याची वेळ येणार नाही. शिवसेना आपल्या चालीने चालते. कुणीही सोम्यागोम्या उठला आणि काही आरोप केले, तर त्याला उत्तर देण्याची तशी गरज नाही. पण वातावरण गढूळ करून सरकारला काम करू द्यायचं नाही असं सुरू आहे. भोंगे, हनुमान चालीसा असे विषय काढले जात आहेत. महागाई, बेरोजगारी हे गंभीर प्रश्न आहेत. पण महाराष्ट्रातले विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आम्हाला महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त शासन द्यायचं आहे. पण त्याआधी गेल्या ५ वर्षांत जो भ्रष्टाचार झालाय, त्याची साफसफाई करावी लागले. तो चिखल फडणवीसांच्या काही सहकाऱ्यांनी केलाय. त्याला आम्ही हात लावायला गेलो, की असे मुद्दे काढले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *